नगर : आषाढी वद्य वारी यात्रेनिमित्त वाहन पार्किंग व्यवस्थेमध्ये मोठा बदल

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नेवासा येथील तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वद्य एकादशीच्या वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून पार्किंग व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गर्कळ यांनी पार्किंगच्या ठिकाणी जाऊन वाहतूक कोंडीच्या दृष्टीने मंगळवारी (दि.11) पाहणी करुन भाविकांच्या सोईच्या दृष्टीने नियोजन केले. गुरूवारी (दि.13) माऊलींच्या होणार्या आषाढी वद्य वारीच्या निमित्ताने सात ते आठ लाख भाविक नेवासा शहरात येण्याची शक्यता आहे.
या दृष्टीने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी चालकांची नेमणूक केली आहे. कोणीही रस्त्यांवर वाहने लावणार नाही, यासाठी चौकाचौकात बंदोबस्त दिला राहील. बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. आपली वाहने पार्किंगमध्येच लावावीत, व्यावसायिकांनी वाहने व सामान यात्रेच्या दिवशी दुकानांसमोर रस्त्यावर लावू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक डोईफोडे यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे फक्त दिंड्याना प्रवेश आहे. भाविकांनी वाहतूक कोंडी टाळून, गाडी सुरक्षित राहण्यासाठी अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच लावावीत.
– शिवाजी देशमुख महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान प्रमुख.
हे ही वाचा :
Rahul Gandhi defamation case | राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या, भाजप आमदाराकडून SC मध्ये कॅव्हेट दाखल