चंद्रकांत यादव : पाकिस्तानातील हैदराबादेतील इकरा जिवानी (वय 19) ही भारतातील आपल्या मुलायम सिंह यादव (वय 25) या प्रियकरासाठी बेकायदा सीमापार भारतात आली… चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यात उघडकीला आलेला हा किस्सा… मुलायमसोबत लग्नाच्या बेडीतही अडकली. दोघे बंगळूरला सोबत राहत होते; पण पोलिसांना कुणकुण लागली आणि मुलायम-इकरा कायद्याच्या बेडीत अडकले… दोन महिने इकराला महिला आधार केंद्रात ठेवल्यानंतर उर्वरित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाघा सीमेवरून बंगळूर पोलिसांनी तिला पाकिस्तानच्या स्वाधीन केले… दुसरीकडे अगदी परवा परवा पाकिस्तानातून आपल्या सचिन मीणा (वय 23) या प्रियकरासाठी बेकायदा भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरच्या (वय 27) बाबतीत मात्र तसे घडलेले नाही. तिला न्यायालयाने जामीनही मंजूर केला आणि महिला आधार केंद्रातही पाठवले नाही. नोएडातील रबुपुरा येथील सचिन मीणाच्या घरीच राहावे, (तेथून कोठेही जाऊ नये, देश सोडू नये) असे आदेश तिला देण्यात आले, जे तिला हवेच होते.
जे सीमा हैदर सध्या सांगते आहे, तेच इकराही रडत-ओरडत सांगत राहिली… मुलायम हेच माझे आयुष्य आहे… मला पाकिस्तानात पाठवू नका. भारतात राहू द्या… पोलिसांना इकराचा हा आक्रोश पाहून गलबलून आले होत हे खरे; पण कायद्यापुढे आम्ही असहाय आहोत, असेच तेव्हा पोलिसांचे म्हणणे होते.
ल्यूडो हा ऑनलाईन गेम खेळता-खेळता इकरा आणि मुलायम परस्परांच्या प्रेमात पडले होते. सीमा हैदर आणि सचिन मीणाही पबजी हा ऑनलाईन गेम खेळता खेळता एकमेकांच्या प्रेमात पडले.
सीमा हैदर आपल्या 4 मुलांसह (3 मुली, 1 मुलगा) कराचीत राहत होती. तिचा गुलाम हैदर हा नवरा 3 वर्षांपासून सौदी अरेबियात आहे. सीमा हैदरच्या मते, त्याने तिला फोनवर तीन तलाक दिलेला आहे. सचिनवर प्रेम जडल्यानंतर मार्चमध्ये ती नेपाळला आली. सचिनही गेला. काठमांडूत पशूपतीनाथ मंदिरात दोघांनी लग्न केले. सप्तपदीनंतर सात दिवस एका हॉटेलात तेथेच दोघे मुक्कामी राहिले. आता भारतात जाऊ, असा हट्ट सीमाने धरला; पण तुझी चारही मुले लहान आहेत, ती निराधार होतील, पुढच्यावेळी मुलांना सोबत घेऊन काठमांडूलाच ये, मग आपण भारतात जाऊन संसार थाटू, असे सचिनने तिला समजावले. ती कराचीला परतली. दोन-तीन महिन्यांत पुन्हा नव्याने सारी तजवीज करून मुलांसह विमानाने आधी शारजाहला व तेथून काठमांडूला आली… आणि बसमधून भारतीय हद्दीत… सीमाने हिंदू वेशभूषा केलेली होती. सीमेवर तपासणीत मुलांची नावेही तिने भारतीय धाटणीची सांगितली. मुलांसह रुबूपुर्यात पोहोचली. इथे मुलांना शाळेत टाकायचे म्हणून आधारकार्ड वगैरेसाठी सचिनने प्रयत्न सुरू केले आणि गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. सचिन, सीमा, सचिनचे वडील व चारही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सीमा-सचिन आधारकार्ड तयार करण्याच्या प्रयत्नातच पकडले गेले… मुलायम मात्र रवा यादव या नावाने इकराचे बनावट आधारकार्ड तयार करण्यात यशस्वी झाला होता. सीमा-सचिनप्रमाणे इकरानेही मुलायमसोबत काठमांडूतच लग्न केले होते.
जानेवारी 2023 मध्ये बंगळूर पोलिसांना पाकिस्तानात केल्या जाणार्या व्हॉटस् अॅप कॉलबद्दल माहिती प्राप्त झाली. रवा बनलेली इकरा ही पाकिस्तानातील आईशी बोलत असल्याचे तपासातून समोर आले.
इकरा-मुलायमला अटक झाली. इकराला 19 फेब्रुवारी रोजी सीमेवर पाकिस्तानी इमिग्रेशन अधिकार्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
बंगळूरहून 1500 कि.मी.वरील प्रयागराज जिल्ह्यातील मकसूदन या खेड्यात राहणारी मुलायमची आई शांतीदेवी जो भेटेल त्याला विनवत राहिली, माझ्या सुनेला परत पाठवावे म्हणून इम्रान खानशी ओळख काढा हो…
सीमा हैदरलाही सचिनच्या आई-वडिलांनी स्वीकारलेले आहे. सीमासह ही सगळीच मंडळी मोदीजी-योगीजींच्याही विनवण्या करत आहेत… सीमा हैदर तर सध्या एक सेलिब्रिटीच बनलेली आहे… तिचा व सचिनचाही संपूर्ण दिवस विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्यात जात आहे…
इकरा पाकिस्तानात परतली, हे भारतात सगळ्यांना माहिती आहे; पण ती सध्या तिथे काय करते आहे, तिचे पुढे काय झाले, हे कुणालाही माहिती नाही.
सीमा म्हणते, मला तिथे जिवंतच राहू देणार नाहीत, जमिनीत गाडून दगडांनी मारतील. तिचा हाच स्टँड तिला या क्षणापर्यंत उपयोगी पडलेला आहे.
हाच स्टँड तिला भारतीय नागरिकत्व मिळवून देतो, की प्रचलित कायद्यानुसार तिला परत सीमापार जावे लागते, हे आता भविष्याच्या उदरात दडलेले आहे…