नाशिक : पुढारी वृत्तसेवा
म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीतून तीन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या परप्रांतिय टोळीतील तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. या टोळीतील संशयितांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून टोळीचा मुख्य सुत्रधार पोलिस वाहनांच्या धडकेत ठार झाला आहे. टाेळीतील एकाकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तुल, चार काडतुसे, कोयता अशी हत्यारे जप्त केली आहेत.
गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, म्हसरुळच्या हद्दीत सोमवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास टोळीने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी चोरट्यांची शोधमोहिम राबवली. त्यात शांतीनगर परिसरात चोरटे दिसल्याने पोलिसांनी पाठलाग केला. दरम्यान, पाठलागावरील वाहनाचे एक्सल तुटल्याने ती एका संशयितास धडकली. त्यात संशयिताचा मृत्यू झाला आहे. पोलिस तपासात त्याचे नाव प्रशांत उर्फ छोटु पाठक असे असल्याचे समजले. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इतरांचा शोध घेत तिघांना म्हसरुळ परिसरातूनच पकडले. तर एक संशयित परराज्यात गेल्याने त्याचा स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून ताबा घेतला गेला. गुन्हे शाखेचे एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी तातडीने परराज्यात रवाना झाले असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.
म्हसरुळला भाडेकरु म्हणून वास्तव्य
टोळीतील दोन सदस्य गेल्या दोन महिन्यांपासून म्हसरुळ परिसरातच भाडेतत्वावर राहत होते. त्यानंतर उर्वरीत संशयित नाशिकला आले व त्यांनी रेकी करीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंंत, विष्णु उगले, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, शरद सोनवणे, प्रदिप म्हसदे, धनंजय शिंदे, विशाल काठे आदींच्या पथकाने संशयितांची धरपकड केली.
पकडलेल्या संशयितांची नावे
विरेंद्रकुमार फुलकरण चौधरी (३३, रा. तेजस अपार्टमेंट, म्हसरुळ, मुळ रा. उत्तरप्रदेश), धमेंद्र उर्फ राहुल रामनारायण पाल (३३, रा. उत्तरप्रदेश), अमरकुमार रामदयाल चौधरी (२८, रा. उत्तरप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. तर अनिल उर्फ फुलकरण चौधरी याचा ताबा घेण्यासाठी नाशिकहून पथक रवाना झाले. अनिल चौधरीविरोधात मोक्कानुसार कारवाई झाली असून अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. तर मृत प्रशांत पाठक याच्याविरोधातही अनेक गुन्हे दाखल असून तो नुकताच मेरठच्या कारागृहातून बाहेर आला होता.
हेही वाचा :