४२५ काेटींच्‍या फसवणूक प्रकरणी ‘सेवा विकास’ बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक, ‘ईडी’ची कारवाई | पुढारी

४२५ काेटींच्‍या फसवणूक प्रकरणी 'सेवा विकास' बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक, 'ईडी'ची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी ) ४२५ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणी सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर साधुराम मुलचंदानी यांना अटक केली आहे. न्‍यायालयाने मुलचंदानी यांना ६ दिवसांची ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे.

‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार, १२४ एनपीए कर्ज खात्यांच्या माध्यमातून बँकेचे ४२९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच बँक दिवाळखोरीत निघाली असून हजारो ठेवीदारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी, संचालक, अधिकारी आणि कर्ज थकबाकीदारांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.

‘ईडी’ने केलेल्या तपासात अमर मुलचंदानी हे आपल्या कुटुंबाची मालकी असल्याप्रमाणे बँक चालवत होते. त्यांनी बँकेतील सार्वजनिक ठेवींना त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेप्रमाणे वापरले. बँकिंग नियमांचे उल्लंघन करून मूलचंदानी यांनी त्यांच्या पसंतीच्या कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केले. यात कर्जदारांची पत तपासली गेली नाही. त्यांच्याकडून आवश्यक तारण घेतले नाही. तसेच, मंजूर कर्जाच्या एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम कमिशन दराने लाच घेत त्यांनी हे कर्ज मंजूर केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

मूलचंदानी यांनी आपल्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार कर्ज मंजूर करण्यासाठी संचालक मंडळात प्रचंड बहुमत असावे या हेतूने त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना बँकेत संचालक केले. त्यामुळे ९२ टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज खाती एनपीए झाली आणि बँक कोसळली. अखेर आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला.

सहा दिवसांची ‘ईडी’ कोठडी

‘ईडी’ने मूलचंदानी यांना अटक केल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ जुलैपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मुलचंदानी यांच्या विविध बेनामी संपत्तीसह याप्रकरणात ईडीने १२२.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानुसार मूलचंदानी यांच्याकडे चौकशी सुरु असून अधिक तपास सुरू असल्याचे ईडीने सांगितले.

हेही वाचा :

Back to top button