सातारा : बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला | पुढारी

सातारा : बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी रस्त्यादरम्यान बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात सुभाष श्रीरंग काळे (रा. सोनाईचीवाडी) हे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी 7 च्या सुमारास घडली आहे.

याबाबत माहिती अशी, सुभाष काळे हे सोमवारी सायंकाळी पाटणहून पापर्डेमार्गे दुचाकीवरून सोनाईचीवाडी येथील घरी निघाले होते. चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी दरम्यान ते आले असता बिबट्याने चालत्या गाडीवर झेप टाकून त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुभाष काळे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते गाडीसह रस्त्याकडेला पडले. यात त्यांच्या पायाला मार लागला. यावेळी बिबट्याने त्यांच्या मानेचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंगातील रेनकोटमुळे त्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले. मात्र बिबट्याने नख्यांनी सुभाष यांच्या डोक्याला, हाताला ओरखडले आहे. दरम्यान, मागून येणार्‍या दुचाकीवरील नागरिकांनी सुभाष यांना ताबडतोब घटनास्थळापासून शेजारी असलेल्या सुर्यवंशीवाडी गावामध्ये नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

यापूर्वीही हल्ल्याच्या घटना…

नागरिकांची सुरक्षा धोक्यात

गव्हाणवाडी, पापर्डे ते साजूर मार्गावर अनेकदा वाहनधारकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. तर बिबट्याकडून दुचाकीवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. असे प्रकार घडू लागल्याने येथून प्रवास करणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button