

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर शिवारात सोमवारी (दि. ३) रात्री विहिरीत बिबट्या पडला. वनविभागाने दोन तास शर्थीचे प्रयत्न करून या बिबट्याला (Nashik Leopard) बाहेर काढले आहे. बिबट्याला नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.
कोल्हेर शिवारात जयराम गवळी यांच्या विहिरीत हा बिबट्या दिसला असता, येथील ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली होती. त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी आले. बिबट्या बाहेर काढण्यासाठी दिंडोरी येथून पिंजरा आणण्यात आला. दिंडोरी तालुक्याच्या वन परिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी घटनास्थळी दाखल झाल्या. विहिरीत बिबट्या असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली होती. विहीर सुमारे 50 फुटांपेक्षा अधिक खोल असल्याने विहिरीत पिंजरा सोडण्यात आला होता. विहिरीच्या कपारीत बसलेला बिबट्या दुपारी 12.30 च्या सुमारास पिंजऱ्यात आल्यानंतर त्याला वर काढण्यात आले. (Nashik Leopard)
यावेळी चौसाळे वनमंडळ, वणी, उमराळे येथील रामचंद्र तुंगार, रूपाली देवरे, राऊत, अशोक काळे, अण्णा टेकनर, हेमराज महाले, हरिश्चंद्र दळवी, मायाराम पवार, रेश्मा पवार, ज्योती झिरवाळ, शिवाजी शार्दुल आदी कर्मचारी उपस्थित होते. पकडलेल्या बिबट्याची नाशिक येथे वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली.
हेही वाचा :