नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली ; भाजप, सेना की, राष्ट्रवादी? | पुढारी

नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली ; भाजप, सेना की, राष्ट्रवादी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रामध्ये रविवारी (दि. 2) राजकीय भूकंप २.० अंक पाहायला मिळाला. मुंबईत घडलेल्या या भूकंपाचे धक्के नाशिकलाही जाणवले. ज्येष्ठ नेते छगन भुबजळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबूत दाखल होत जिल्ह्याची पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यासोबत पालकमंत्री पदावरून आधीच सेना-भाजपमध्ये रस्सीखेच असताना ना. भुजबळ यांच्या रूपाने आणखी एक स्पर्धक वाढीस लागला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. ना. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या सर्व घडामोडीत चर्चेचा विषय ठरली आहे, ती भुजबळ यांची शपथ. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या भुजबळांनी अजित पवार गोटात सामील होत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या धक्क्यातून नाशिककर सावरत असतानाच भुजबळ समर्थकांना पालकमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले आहे. त्यामुळे पद १ आणि पक्ष तीन अशी अवस्था निर्माण झाली आहे.

वास्तविक, आगामी लोकसभेच्या दृष्टीने भाजप जोरदार तयारीला लागली आहे. या तयारीत महिनाभरापासून भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेत थेट केंद्र व राज्यातील पक्षाच्या मंत्र्यांना पाचारण करत मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. त्यामुळे सेना-भाजपमध्ये आधीच वातावरण कलुषित होत असताना भाजपने संकटमोचक ना. गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये सक्रिय करत एकप्रकारे पालकमंत्री पदावरच दावा ठाेकला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध चांगलेच पेटले असून, विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांचीही अस्वस्थता वाढीस लागली आहे. अशा सर्व परिस्थितीत नाशिकवर दावा कोणाचा? सेनेचा की भाजपचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असताना राष्ट्रवादीतील फाटाफुटीमुळे पुन्हा एकदा या वादाला फोडणी मिळाली आहे. ना. भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी त्यांची प्रबळ दावेदारी निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पालक पदाच्या रस्सीखेचमध्ये कोण सरस ठरणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

मालेगाव जिल्हा करावा

महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतर पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठी नाशिकमधून मालेगावला वेगळे करत स्वतंत्र मालेगाव जिल्हानिर्मिती करावी. मालेगावचे पालकमंत्री पद ना. दादा भुसे यांना बहाल करावे, अशी दबक्या आवाजात भुसे समर्थक मागणी करू लागले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button