‘आधे इधर, आधे उधर’; साताऱ्यात राष्ट्रवादीत उभी फूट; पक्ष संघटनेतही फुटाफुटी | पुढारी

‘आधे इधर, आधे उधर’; साताऱ्यात राष्ट्रवादीत उभी फूट; पक्ष संघटनेतही फुटाफुटी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते अजित पवार यांनी भाजपसोबत व सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, अमित कदम यांच्यासह अनेकांनी अजित पवारांंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक खा. शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या जिल्ह्याच्या संघटनेतही अनेक ठिकाणी फुटाफुटी झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवार व अजित पवार यांचा पगडा राहिला आहे. अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री राहिल्याने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण वर्गावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक अस्वस्थतेचे वातावरण सातारा जिल्ह्यात आहे. शरद पवार यांचा सातारा हा लाडका जिल्हा. पक्षाच्या स्थापनेवेळी 9 आमदार व 2 खासदार या जिल्ह्याने दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्याने भरभरून मतदान केले आहे. त्याच शरद पवार व अजित पवार यांच्यात फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे.

अजित पवार सरकारमध्ये सामील झाले तेव्हाच्या शपथविधीला विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण स्वत: उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही या तिघांची नावे दिसत होती. आ. मकरंद पाटील यांचे नाव तर मंत्रिपदाच्या यादीत घेतले जात होते. या उलट आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांचे मित्र खा. श्रीनिवास पाटील यांनीही खा. शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे.

सातारा जिल्ह्यात शरद पवार व अजित पवार यांना मानणारे स्वतंत्र गट आहेत. मध्यंतरीच्या काळात अजितदादांनी अनेक
जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र दौरे करून चाचपणी केली होती. या चाचपणीला आता अर्थ प्राप्त झाला आहे. अजित पवारांनी या दौर्‍यात भविष्यात आपण तरूण व नव्या चेहर्‍यांना संधी देणार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी अजित पवारांंच्या बंडाची कल्पना आली होती. आता या बंडाला सातारा जिल्ह्यातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Back to top button