Ajit Pawar News : शिवसेना चालते, भाजप का नाही? शपथविधीनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी नेतृत्वाला सवाल | पुढारी

Ajit Pawar News : शिवसेना चालते, भाजप का नाही? शपथविधीनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी नेतृत्वाला सवाल

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  आम्ही यापूर्वी शिवसेनेची जातीयवादी भूमिका विसरून त्यांच्यासोबत गेलो. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवारांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला गेली नऊ वर्षे खंबीर सरकार दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठीच आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar News)

पक्षाचे सर्व आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. या सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो आहोत. यापुढील सर्व निवडणुका आम्ही महायुतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवू, असेही त्यांनी सांगितले. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये ते सामील झाले आहेत. ते भाजपमध्ये जाऊ शकतात तर राज्यात असा निर्णय घ्यायला काय हरकत आहे, असेही अजित पवारांनी सांगितले. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामध्ये आपले आणखी काही सहकारी मंत्री बनून शपथ घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar News)

राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ उपस्थित होते. (maharashtra news ajit pawar)

संबंधित बातम्या

देश आणि राज्यात विकासाला महत्त्व दिले गेले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाला महत्त्व देत अतिशय मजबुतीने देशाला पुढे नेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. देशाला एक चांगले नेतृत्व मिळाले असताना त्यांना विरोध करण्यासाठी काही पक्ष एकत्र येत आहेत. पण आज देशात मोदींसारखे नेतृत्व विरोधी पक्षात नाही. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशाचा मान त्यांनी जगात उंचावला आहे. मी माझी भूमिका पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली. त्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. (maharashtra news ajit pawar)

यापुढील काळात तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. राज्याच्या विविध विभागातून नवीन कार्यकर्ते पुढे आणले पाहिजेत. तसा आमचा प्रयत्न पुढील काळात राहणार आहे. आमच्यावर काही लोक टीकाटिप्पणी करतील; पण आम्ही राज्य आणि देशाचे हित पाहूनच हे पाऊल उचलले आहे, असा दावा अजित पवारांनी केला. (Ajit Pawar News)

शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला

अजित पवार (ajit pawar deputy cm) यांनी आपण शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपल्या सहकार्‍यांशी चर्चा करून शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. आमच्याकडे आकडा आहे. पक्ष आमच्याबरोबर आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. यापूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाला होता. 24 वर्षांत पक्षाने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. या 24 वर्षांत पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले आहे. राज्यात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले आहेत. 1990 पासून युती आणि आघाडीचे सरकार येत आहे. कोणाचे ना कोणाचे सहकार्य घेऊनच सरकार स्थापन करावे लागते आहे. त्यामुळे राज्य आणि देशाच्या विकासासाठी आम्ही मोदींसोबत जाण्याचा पर्याय घेतला आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आम्ही तिन्ही पक्ष मिळून लढूवू, असे अजित पवारांनी सांगितले. (Ajit Pawar News)

मोदींच्या हातात देश सुरक्षित : भुजबळ

छगन भुजबळ यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही नरेंद्र मोदींवर कायम टीका केली. पण, ते अतिशय मजबुतीने देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे. विकासाच्या कामात ते ताबडतोब निर्णय घेतात. बाकीच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. (ajit pawar deputy cm) अजित पवार जे बोलले त्यांच्याशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही राज्य सरकारमध्ये तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

आम्हाला राज्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. त्यासाठी केवळ भांडत बसून चालणार नाही तर सकारात्मकपणे काम करणे आवश्यक आहे. पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यामध्ये फार काही चांगले चित्र नव्हते. विरोधी पक्ष एकत्र आले तरी ते आपापल्या राज्यापुरते पाहात आहेत, असे सांगतानाच शरद पवार यांनीच काही दिवसांपूर्वी आम्हाला देशात पुन्हा मोदीच पंतप्रधान म्हणून येतील, असे सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला.

हेही वाचा

 

Back to top button