नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनने जोर पकडला आहे. अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जूनमधील सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्याची नोंद झाली आहे.
यंदाच्या वर्षी लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना आठवडाभरापासून राज्यात सर्वदूर त्याने दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये त्यातही विशेष करून ग्रामीण भागात पावसाचा वेग वाढला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १६८.६ मिमी इतके आहे. आजमितीस गुरुवारी (दि. २९) ७६.४ मिमी म्हणजेच अवघ्या ४५.३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. सहा तालुक्यांमध्ये जूनच्या सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामध्ये मालेगाव, कळवण, निफाड, येवला, त्र्यंबकेश्वर आणि देवळा तालुक्यांचा समावेश आहे. तर पाच तालुक्यांमध्ये ४० ते ५० टक्क्यांदरम्यान पर्जन्यमान झाले असून, त्यापेक्षा कमी पर्जन्याचे प्रमाण असलेल्या तालुक्यांची संख्या चार इतकी आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पर्जन्य आतापर्यंत झाले आहे. सर्वात नीचांकी म्हणजे २९ टक्के पर्जन्याची नोंद नाशिक तालुक्यात झाली आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातही ३८.१ टक्के पाऊस पडला आहे. उशिरा का होईना, पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
जुलै महिन्यात चांगले पर्जन्य
सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू असून, त्याचे वाहन मेंढा आहे. या काळात सर्वत्र चांगला पाऊस झाला. 6 जुलै रोजी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करत असून त्याचे वाहन गाढव असेल. पुनर्वसू नक्षत्रामध्ये संपूर्ण महिनाभर चांगला पाऊस असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तालूकानिहाय पर्जन्याची टक्केवारी
मालेगाव ७०.१, बागलाण ४५, कळवण ६२.४, नांदगाव ४७.३, सुरगाणा ४५.५, नाशिक २९.१, दिंडोरी ४४.७, इगतपूरी ३८.१, पेठ ३६.२, निफाड ६७.६, सिन्नर ४२.१, येवला ७७.४, चांदवड ३७.५, त्र्यंबकेश्वर ५३.६, देवळा ६०.८, एकूण सरासरी ४५.३.