नाशिक : अवघा रंग एक झाला; रंगी रंगला श्रीरंग! | पुढारी

नाशिक : अवघा रंग एक झाला; रंगी रंगला श्रीरंग!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग

मी तू पण गेले वाया

पाहता पंढरीचा राया!

नभी फडकणारी भगवी पताका अन‌् मुखी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’चा घोष आणि क्षणाक्षणाला भाविकांचा वाढणारा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (दि.२९) आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विठुरायाची पालखी व दिंडी सोहळा रंगला.

आषाढी एकादशीनिमित्ताने शहर-परिसरातील विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटेपासून नाशिककरांची दर्शनासाठी रीघ लागली. जुन्या नाशिकमधील काजीपुरा येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पाचच्या सुमारास श्रींचा महाभिषेक व महाआरती करण्यात आली. हुंडीवाला लेनमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मंत्रोच्चाराच्या जयघोषात धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या विहितगाव येथील मंदिरात हजारो भाविक विठ्ठलाचरणी नतमस्तक झाले.

शहरातील काॅलेज रोड, अशोकस्तंभ, पंचवटीतील राम मंदिर उत्तर दरवाजा यासह ठिकठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरे आषाढीनिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाली. तसेच मंदिर समितीतर्फे दिवसभर भजन, कीर्तनासह निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. एकूणच वातावरण शहर विठ्ठलाच्या भक्तिरसात दंग झाले.

महाप्रसादाचे वाटप

शहरातील विविध धार्मिक संस्था, मित्रमंडळांनी आषाढीचे औचित्य साधत महाप्रसादाचे वाटप केले. त्यामध्ये साबुदाणा खिचडी, केळी, राजगिरा लाडू व चिक्की यासह निरनिराळ्या फळांचे वितरण करण्यात आले. भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

शिबिरांचे आयोजन

शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरांच्या परिसरात यावेळी विविध सेवाभावी संस्था व रुग्णालयांनी संयुक्तरीत्या रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी अशा शिबिरे घेतली. मंदिरात येणाऱ्या भाविकांचा या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभला.

हेही वाचा : 

Back to top button