कृष्णा खोरे व रामराजेंचा काडीमात्र संबध नाही : खा. रणजितसिंह | पुढारी

कृष्णा खोरे व रामराजेंचा काडीमात्र संबध नाही : खा. रणजितसिंह

फलटण, पुढारी वृत्तसेवा : आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी जे आतापर्यंत राजकारण केले ते फक्त आणि फक्त खोटे बोलूनच केले आहे. रामराजे व धोम-बलकवडी, नीरा-देवधर अगदी ज्या महामंडळाचे हे स्वत:ला जनक म्हणवून घेतात त्या कृष्णा खोरे महामंडळाचासुध्दा त्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशी टीका खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. रामराजेंवर पत्रकार परिषदेत केली.

खा. रणजितसिंह म्हणाले, कृष्णा खोरे महामंडळाचा पहिला प्रस्ताव रामराजे राजकारणात येण्याआधीचा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे हे महामंडळ स्थापन झाले. त्यानंतर भाजप व सेना युतीत धोम-बलकवडी प्रकल्प मार्गी लागला. यामध्ये रामराजे यांनी 30 वर्षे ज्यावर तालुक्याचे राजकारण केले त्या धोम-बलकवडी प्रकल्प व रामराजेेंचा काडीमात्र संबंध नाही. आगामी काळात हा प्रकल्प बारमाही करणार आहे.

आता आठमाही करण्याचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. काहीच महिन्यात नीरा-देवधरचे झिरो वॉटर धोम-बलकवडीद्वारे फलटण तालुक्यात पाणी आणणार आहे. धोम-बलकवडीची जेव्हा आखणी झाली होती. तेव्हाच हे करायचे ठरले होते. फक्त अडगळीत पडलेले प्रश्न मी मार्गी लावत आहे. नीरा-देवधर व धोम-बलकवडीच्या जोड कालव्यास स्वराज हिंद नाव देण्यात येणार आहे.

फलटण ते बारामती रेल्वेचे टेंडर प्रसिध्द झाले आहे. भविष्यात फलटण तालुक्याला याचा फायदा होणार आहे. फलटण येथे जिल्हा न्यायालयाला मंजुरी मिळाली आहे. तसेच फलटण येथे काही महिन्यात जिल्हास्तरीय सर्व कार्यालये सुरू करणार असल्याचेही खा. रणजितसिंह म्हणाले.

Back to top button