Nashik : तपोवनात स्कूल व्हॅन व पिकअप यांच्यात अपघात, विद्यार्थी जखमी | पुढारी

Nashik : तपोवनात स्कूल व्हॅन व पिकअप यांच्यात अपघात, विद्यार्थी जखमी

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

अपघातांची मालिका शहरात सुरूच असून आज सकाळी तपोवन परिसरात स्कूल व्हॅन व पिकअप यांच्यात जोरदार धडक होवुन अपघात घडला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल व्हॅनला एका पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला असून सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरीत विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहचविण्यात आले आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत असून अपघातात स्कूल व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रविवारची सुट्टी झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. जवळपास १० ते १२ विद्यार्थी रोजप्रमाणे स्कूल व्हॅनमध्ये शाळेत जात होते. मात्र कोणाला काही कळायच्या आत तपोवन याठिकाणी पिकअप वाहनाने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोऱ्यात होती की, व्हॅन पलटी झाली. या अपघातात काही विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात लागले असुन बाकी विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. येथील उपस्थित नागरिकांनी वेळीच धावा घेऊन विद्यार्थ्यांना गाडीच्या बाहेर काढले व त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. स्कुल व्हॅन एक साईडने पूर्णतः दाबली आहे. व्हॅन मधील सर्व विद्यार्थी इयत्ता पाचवी ते सहावीत शिकत असून ते बिडी कामगार नगर परिसरातील रहिवासी आहेत.

“आम्ही हळूपणे शाळेत जात होतो, मात्र एकीकडून अचानक पिकअपवाला आला आणि आम्हाला धडक दिली, आणि आमची गाडी पलटी झाली. मला पायाला लागलं असून एका मुलाच्या हाताला लागलं आहे, त्याचा मोठा रक्तस्त्राव होत होता, आणखी एका मुलीच्या डोक्याला लागले आहे.” अशी आपबीती एका विद्यार्थिनीने सांगितली आहे.

हेही वाचा :

Back to top button