Ashadi Vari : आषाढीसाठी आजपासून धावणार लालपरी | पुढारी

Ashadi Vari : आषाढीसाठी आजपासून धावणार लालपरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस लागलेल्या जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जादा बसेस रविवारपासून (दि.२५) धावणार आहेत. एसटी महामंडळाच्या विविध डेपोंमधून २९० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ही सुविधा ४ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्ताने येत्या गुरुवारी (दि.२९) पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा भरणार आहेे. या मेळ्यात सहभागी होत भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वारकरी पंढरीकडे प्रयाण करणार आहेत. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी नाशिक विभागामधून पंढरीच्या वारीसाठी जादा बसेस साेडण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध एसटी डेपोंमधून रविवारपासून (दि.२५) या बसेस साेडण्यात येतील. पहिल्या टप्प्यात ७० बसेसचे नियोजन आहे. तसेच २७ ते ३० जून या काळात दररोज ११० बस जिल्ह्यातील विविध आगारांमधून पंढरीकडे मार्गस्थ केल्या जाणार आहेत. नाशिकच्या महामार्ग बसस्थानकासह मालेगाव, सटाणा, मनमाड, सिन्नर, लासलगाव, नांदगाव, इगतपुरी, येवला, कळवण, पेठ आणि पिंपळगाव बसवंत येथून बस सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

गावातच एसटी

विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने अधिक सुविधा देण्यावर भर दिला आहे. एखाद्या गावामधून मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना पंढरपूरला जायचे असल्यास थेट गावातून बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button