

बारामती (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : पणदरे (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत सदस्य विक्रम भरत कोकरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 22) गावातील व्यवहार बंद ठेवले. विक्रम कोकरे यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र ऊर्फ शत्रुघ्न शिवाजी कोकरे, कुणाल चेतन कुंभार, तुषार हनुमंत कोकरे, धैर्यशील संभाजी कोकरे, चेतन विठ्ठल कुंभार, स्वप्नील चेतन कुंभार, तानाजी तात्यासाहेब कोकरे, अमित शिवाजी कोकरे, कुलभूषण हनुमंत कोकरे, तेजस संजय कोकरे, पृथ्वीराज तानाजी कोकरे, सोमनाथ भारत माने, हर्षल चंद्रकांत जाधव, राजेंद्र लालासो मदने, विशाल दत्तात्रय कोकरे, योगेश गवळे, भारत कोकरे व गणेश नाना खोमणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (दि. 21) रात्री पावणेबाराच्या सुमारास पणदरे बाजारतळाजवळ फिर्यादीच्या पाण्याच्या प्लॉन्टजवळ ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, म्हसोबाचीवाडी येथील गायरान व गावठाण जमिनीतील अतिक्रमण प्रश्नी फिर्यादीने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. तसेच खामगळवाडी येथील खडी क्रशर बंद करण्याच्या प्रश्नावर लढा दिला. त्याचा राग मनात धरून डोक्यात स्टीलचा रॉड व दगड मारत, लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण करण्यात आली. जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॅन्टच्या खिशातील 25 हजार 660 रुपयांची रोख रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पणदरे बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. गावामध्ये तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर माळेगाव पोलिसांकडून गावात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेण्यात आला होता. आरोपींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी पणदरे पोलिस चौकीसमोर ठिय्या मांडला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी चेतन कुंभार, कुणाल कुंभार, स्वप्नील कुंभार यांना अटक केली.
हे ही वाचा :