पुणे : शिफारसपत्रासाठी पैसे घेणार्‍या दोन महिला कर्मचार्‍यांवर गुन्हा | पुढारी

पुणे : शिफारसपत्रासाठी पैसे घेणार्‍या दोन महिला कर्मचार्‍यांवर गुन्हा

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा :  महिला बचत गटाला बँकेत कर्ज प्रकरणाकरिता लागणारे शिफारस पत्र देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ शिवनेरी लोकसंचलित साधन केंद्र जुन्नरमधील दोन महिला कर्मचार्‍यांनी 10 हजार रुपये घेत शिफारस पत्र दिले. त्यानंतर ते परत माघारी घेत एका महिला बचत गटाची फसवणूक केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका गोरडे (रा. बस्ती सावरगाव, ता. जुन्नर) व मनीषा काळे (रा. येणेरे, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत. वसुंधरा महिला गटाच्या सचिव सारिका पवार (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी जुन्नर पोलिस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दिली आहे.

नारायणगाव येथील वसुंधरा महिला बचत गटाला व्यवसायाकरिता 10 लाख रुपयांचे कर्ज लागत होते. बँक ऑफ इंडिया शाखेने या कर्जाकरिता शिफारस पत्र मागितले होते. त्यानुसार महिला आर्थिक विकास महामंडळ शिवनेरी लोकसंचलित साधन केंद्रात शिफारस पत्राबाबत वसुंधरा महिला बचत गटाकडून विचारणा केली गेली. या केंद्रात व्यवस्थापिका आणि लिपिका म्हणून प्रियांका गोरडे व मनीषा काळे या दोघी कार्यरत आहेत. या दोघींनी संगनमताने शिफारस पत्राकरिता 10 हजार रुपये लागतील, असे बचत गटाला सांगितले. त्यानुसार त्यांना बचत गटाकडून 10 हजार रुपये देण्यात आले. मात्र, गोरडे यांनीच बँकेत जाऊन त्यांनीच दिलेले शिफारस पत्र माघारी घेतले. त्यामुळे बचत गटाला कर्ज मंजूर झाले नाही.

कर्ज प्रकरणाकरिता शिफारस पत्र देण्यासाठी 10 हजार रुपये घेत ते परत घेत बचत गटाची फसवणूक करण्यात आली. याशिवाय वारूळवाडी येथील सृष्टी महिला बचत गटाकडूनदेखील कर्ज प्रकरणाकरिता 10 हजार रुपये गोरडे यांनी फोन पेद्वारे वैयक्तिक खात्यावर घेतले आहे. 4 महिन्यांपूर्वी घेतलेल्या या पैशांची पावती जून महिन्यात दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे पुढील तपास करीत आहेत.

हे ही वाचा : 

जालना : शेगाव दर्शनाहून परतताना कारचा अपघात; महिलेचा होरपळून मृत्‍यू

पुणे-लोणावळा मार्गासाठी राज्य सरकार निधीतील निम्मा वाटा उचलणार

Back to top button