नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही ‘पीएमश्री’ शाळेला टाळेच राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील कारसूळ जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची पेसाअंतर्गत बदली झाली असून, त्या जागी नवीन शिक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा पवित्रा शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, निफाड गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दि. 15 जूनपासून शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्रात नाशिक जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होत आहेत. आदिवासी शाळांवर 100 टक्के शिक्षक पदे भरण्याच्या अट्टाहासापायी आमच्या बिगरआदिवासी भागात शिक्षण घेणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक मिळत नाही. असे असताना या भागातील शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या चुकीच्या धोरणाला आमचा विरोध आहे. समान शिक्षणासाठी समान शिक्षक धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने किमान कारसूळ शाळेच्या भवितव्यासाठी पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उघडू न देण्याबाबतचा निर्णय कारसूळ ग्रामस्थांनी घेतला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षक सुभाष विंचू व उपशिक्षक राजाभाऊ कदम यांची बदली मे 2023 मध्ये झालेली आहे. कारसूळ प्राथमिक शाळेत आजही नवीन शिक्षक हजर न झाल्यामुळे अद्यापही दोन्ही शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. कारसूळ येथील ग्रामस्थ व शिक्षकांनी लोकसहभागातून शाळा उभारली आहे. शाळेचा पट वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कारसूळ शाळेच्या विकासाच्या जडणघडणीतूनच मागील शैक्षणिक वर्षी नाशिक जिल्ह्यातून कारसूळ शाळा पीएमश्री घोषित झाली आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विविध योजना व उपक्रम राबवून जिल्हा व राज्यस्तरावर शाळेने नावलौकिक मिळवला आहे. परिसरातील एक नावीण्यपूर्ण आदर्श शाळा असलेल्या कारसूळ शाळेतील या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांच्या बदलीने रिक्त जागी जिल्हा परिषदेतून एकाही शिक्षकाची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद पीएमश्री शाळेला पुढील पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात, तसेच राज्य व देश पातळीवर पुढे नेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. परंतु, शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्याऐवजी दोन शिक्षक काढून घेतल्याने शाळा व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत शाळा उघडू न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बदली होऊन दुसरीकडे गेले असून, त्यांच्या बदल्यात एकही शिक्षक आपल्या शाळेत आलेले नाही. अजून किती दिवस आपल्या मुलांनी लोकांच्या बांधावर जाऊन काम करायचे. – देवेंद्र काजळे, उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news