Cyclone Biparjoy | ‘बिपरजॉय’चा धोका! पीएम मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा | पुढारी

Cyclone Biparjoy | 'बिपरजॉय'चा धोका! पीएम मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा

पुढारी ऑनलाईन : हवामान विभागाने (IMD) पूर्व- मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’च्या पार्श्वभूमीवर सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी बैठक घेतली.

अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ “बिपरजॉय” गेल्या ६ तासांमध्ये प्रतितास ७ किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आणि आज, 12 जून रोजी ते भारतीय वेळेनुसार ८.३० वाजता पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे ३२० किमीवर, देवभूमी द्वारकेच्या नैऋत्येस ३६० किमी, जखाऊ बंदराच्या दक्षिणेस ४४० किमी, कच्छमधील नलियाच्या नैऋत्येस ४४० किमी आणि कराची (पाकिस्तान) च्या दक्षिणेस ६२० किमी अंतरावर घोंघावत होते.

१४ जून रोजी सकाळपर्यंत ते उत्तरेकडे आणि नंतर उत्तर-पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. 15 जूनच्या दुपारपर्यंत जखाऊ बंदर (गुजरात) जवळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानच्या सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतची पाकिस्तानची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या दरम्यान प्रतिताशी १५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कच्छ जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात कलम १४४ लागू करत जमावबंदी केली आहे. लोकांना किनाऱ्यावर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातच्या दक्षिण आणि उत्तर किनार्‍यावरील मासेमारी थांबवण्यात आली आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button