नाशिक : महसूल विभागात “ई – ऑफिस’; नव्या प्रणालीमुळे फायलींचा प्रवास होणार गतिमान | पुढारी

नाशिक : महसूल विभागात "ई - ऑफिस'; नव्या प्रणालीमुळे फायलींचा प्रवास होणार गतिमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महसूल विभागातील कामकाजात पारदर्शकता व गतिमानतेसाठी शासनाने ई – ऑफिस प्रणाली लागू केली आहे. नाशिकराेड येथील विभागीय महसूल आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पहिल्या टप्प्यात ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महसुली फायलींचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळत आहे.

शासकीय काम आणि सहा महिने थांब ही म्हण आपल्याकडे सर्वश्रुत आहे. एखाद्या कामासाठी शासकीय कार्यालयाची पायरी चढल्यानंतर महिनोनमहिने प्रतीक्षा करण्याची वेळ सामान्यांवर ओढवते. त्यातही पैसे मोजल्याशिवाय फायली एका टेबलवरून पुढे सरकत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. या सर्व तक्रारींची दखल घेत शासनाने प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली पुढे आणली आहे. पहिल्या टप्प्यात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.

महसूल विभागात ई-ऑफिस प्रणालीमुळे फायलींचा प्रवास आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामध्ये लिपिकाकडून स्कॅन करून फायली ऑनलाइनरीत्या ई-ऑफिसवर दाखल केल्या जातील. तेथून पुढे तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी अशा चार टप्प्यांत फायलींचा प्रवास होणार आहे. या प्रवासात अधिकाऱ्यांकडे स्कॅन होऊन आलेल्या फायलींवर आधारबेस ओटीपीच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षऱ्या होणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या मुख्यालयी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यापुढील टप्प्यात प्रांताधिकारी व तहसीलस्तरावर ई-ऑफिस प्रणाली सुरू होणार आहे. येत्या काळात अधिकाऱ्यांना मोबाइलवरदेखील कामकाजाच्या फाइल्स, कागदपत्रे बघता येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे तातडीने मार्गी लागतानाच आर्थिक देवघेवीच्या प्रकारावर पायबंद येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणाऱ्या सर्व फायली वेळेत निकाली काढण्यासाठी ई-ऑफिसची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे होते. माझ्या कार्यालयात मी आता प्रत्यक्षात फायली स्वीकारत नाही. आम्ही फक्त ई-फायली स्वीकारतो. सर्व विभागांना फाइल्स ऑनलाइन पाठवण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे.

– बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी, नाशिक.

हेही वाचा : 

Back to top button