एक गर्भपात, एक अपत्य; तरी त्याचा लग्नाला नकार... हतबल तरुणीची कैफियत | पुढारी

एक गर्भपात, एक अपत्य; तरी त्याचा लग्नाला नकार... हतबल तरुणीची कैफियत

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या 22 वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे तिच्यासोबत एकाच खोलीत राहिला. एकदा तिचा बळजबरीने गर्भपात केला. त्यानंतर वर्षभराने तिला त्याच्यापासून एक मुलगी झाली. तरीही तिच्याशी लग्न केलेच नाही. या फसवणुकीच्या गुन्ह्यात नगर तालुक्यातील वाळकी येथील तरुणाला नगरच्या कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सोहेल उबेद पठाण (वय 21, रा. बस स्टँडमागे, वाळकी ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी युवती केडगाव येथील असून ती नगरमधील एका हॉस्पिटलमध्ये काम करते.

सन 2021 मध्ये सोहेल त्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. तेथे त्याची तिच्याशी ओळख झाली. त्यांचे प्रेम जुळले. तेव्हापासून सोहेल तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा. नंतर त्याने कल्याण रोड परिसरात एक खोली भाड्याने घेऊन तेथे लग्नाशिवायच दोघे एकत्र राहू लागले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. मात्र त्याने तिला बळजबरीने गर्भपात करायला भाग पाडले. काही दिवसांनी त्याने साईनगर, अरणगाव येथे भाडयाने खोली घेतली व तेथे तो त्याच्यासोबत तिला राहण्यास घेऊन गेला. तेथे राहत असताना पुन्हा ती सोहेलपासून गर्भवती झाली. त्या वेळी त्याने तिला वाळकी येथे त्याच्या घरी नेले. तेथे तिने त्याला लग्न करण्याचा आग्रह धरला. ती ‘माझ्याशी लग्न कर’ म्हणायची तेव्हा तो तिला शिवीगाळ करायचा आणि ‘गर्भपात कर, नाहीतर तुला जिवे मारीन’ अशी धमकी देऊन लाथाबुक्क्याने मारहाण करायचा. या अत्याचाराला कंटाळून ती आठ महिन्यांची गर्भवती असताना केडगाव येथे आईकडे राहायला गेली.

दि. 24 एप्रिल 2023 रोजी नगरमधील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूती होऊन तिला मुलगी झाली. त्यानंतर अनेकदा तिने त्याला लग्न करण्याची विनंती केली. मात्र त्याने लग्नास नकारच दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर तिने शुक्रवारी (दि. 9) नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सोहेलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

हे ही वाचा :

सामाजिक सलोखा बिघडवताय? सावधान ! भडकविण्याची भाषा केल्यास होईल कारवाई

कर्नाटकच्या नव्या पुलांमुळे शिरोळला महापुराचा जादा फटका बसणार?

 

Back to top button