Nashik : क्वालिटी सिटीमध्ये नाशिक देशात पहिल्या पाचमध्ये | पुढारी

Nashik : क्वालिटी सिटीमध्ये नाशिक देशात पहिल्या पाचमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे क्वालिटी सिटी म्हणून पहिल्या टप्प्यात देशातील पाच शहरांमध्ये नाशिकची निवड करण्यात आली आहे. कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या बाबींवर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

पालकमंत्री दादा भुसे यांची क्वालिटी सिटी नाशिकच्या सुकाणू समितीने भेट घेतली. याप्रसंगी ना. भुसे यांनी क्वालिटी सिटीअंतर्गत स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांचा कौशल्य विकास कार्यक्रम आणि त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून शाळा, वॉर्ड, सर्व प्रशासकीय व खासगी कार्यालयांमध्ये स्वच्छता असावी. तसेच आपले शहर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा सर्व नागरिकांना मिळावी, यासाठी विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जाणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

याप्रसंगी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितू ठक्कर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. उद्योजक हेमंत राठी, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, सचिन जोशी, निखिल पांचाळ, धनंजय बेळे, अनंत राजेगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व भाऊलाल तांबडे, बंटी तिदमे, युवराज मोरे आदी उपस्थित होते. यावेळी उपक्रमासाठी नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटिझन्स फोरम व श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

जनआंदोलन बनवावे : भुसे

शिक्षणाअंतर्गत क्वालिटी सिटीची पहिली पायरी म्हणजे शाळेतून होणारी गळती रोखणे आहे. तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांची या महिन्याच्या अखेरीस शाळेत नोंदणी करणे गरजेचे असल्याचे मत पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केले. याशिवाय घरगुती कामगारांच्या प्रशिक्षणालाही क्वालिटी सिटीमध्ये महत्त्व दिले जात आहे. क्वालिटी सिटी उपक्रमाला जनआंदोलन बनवावे, अशी सूचना भुसे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button