

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्त्या प्रा. कुमुद मोतीराम पावडे (Kumud Pawde) यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेली ६० वर्षे आंबेडकरी विचारविश्वात आपल्या वैचारिक लेखनाने त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी ३६ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. द्वारका मठाधीश शंकराचार्याच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृत पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवावर आज, गुरूवार १ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रा. कुमुद पावडे यांचा मूळ पिंड एका मनस्वी कार्यकर्तीचा होता. त्या अनेक कार्यकर्ते अन् अभ्यासकांच्या प्रेरणास्रोत राहिल्या. विदर्भातील आंबेडकरी चळवळ त्यांच्या नेतृत्वात बहरली. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. माहेरच्या कुमुद सोमकुवर यांनी १७ एप्रिल १९६२ रोजी मराठा समाजातील गांधीवादी कार्यकर्ते मोतीराम गुलाबराव पावडे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. वयाच्या १४ व्या वर्षापासून त्यांनी लेखन सुरू केले. अस्मितादर्श, स्री, किर्लोस्कर, साधना, चौफेर आदी मासिकातून विपुल वैचारिक लेखन केले. (Kumud Pawde)
"अंत:स्फोट' या त्यांच्या वैचारिक लेखांच्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९६२ पासून त्या आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचे काम करीत होत्या. नॅशनल फेडरेशन ऑफ दलित वुमेनच्या संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले. १९९२ पासून २००६ पर्यत जगभरातील विविध देशांमध्ये अभ्यास दौरेही केले.
त्यांच्या पश्चात कृषी अर्थतज्ज्ञ व शेती प्रश्नाचे अभ्यासक डॉ. अमिताभ पावडे, डॉ. अभिजित पावडे, डॉ. अपूर्व पावडे ही तीन मुले व अपर्णा नितीन चायंदे ही विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर १ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अधिक वाचा :