नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण | पुढारी

नाशिक : सारूळमधील खाणपट्ट्यांचे रेखांकन; केंद्रीय पथकाकडून ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सारूळ (ता. नाशिक) मधील अवैध उत्खननाचा मुद्दा गाजत असताना प्रशासनाने या भागातील खाणपट्ट्यांचे रेखांकन सुरू केले आहे. पुढील टप्प्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून या भागाचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे अवैध उत्खननाची नेमकी माहिती हाती येण्यास मदत हाेणार असल्याने खाणपट्टेधारकांचे धाबे दणाणले आहेत.

सारूळ व परिसरात नियमबाह्य डोंगर उत्खननाचा मुद्दा वर्षभरापासून गाजताे आहे. हा वाद थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. या दरम्यान सदर भागात परवानगीपेक्षा अधिकचे उत्खनन झाल्याच्या तक्रारींवरून जिल्हा प्रशासनाने २१ सप्टेंबर २०२२ रोजी तब्बल २१ खाणपट्टे सील केले. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्या नुसार विखे-पाटील यांनी सारूळच्या तपासणीसाठी थेट नगरच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथक नेमले आहे. या पथकाच्या तपासणीनंतर विशेष पथकातील सदस्य तथा नगरचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सुनील इंदलकर यांनी थेट राज्याचे जमाबंदी आयुक्तांनाच पत्र देत सारूळ परिसरातील खाणपट्ट्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची मागणी केली आहे. तसेच ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ची मदत घेण्याची विनंती पत्रात केली आहे. जमाबंदी आयुक्तांनी त्यास हिरवा कंदील दाखविल्याने लवकरच केंद्राचे पथक मोजणीसाठी नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वी जिल्हा प्रशसानाने भूमिअभिलेख विभागाच्या मदतीने सारूळ परिसरातील खाणपट्ट्यांचे रेखांकन सुरू केले आहे. पथक दाखल झाल्यानंतर त्यांच्यामार्फत या भागाचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम केले जाईल. त्यानंतरच निश्चित किती उत्खनन झाले याची आकडेवारी स्पष्ट होईल.

प्रथमदर्शनी अधिकचे उत्खनन

नगरच्या पथकाने केलेल्या सर्व्हेत सारूळ भागात परवानगीपेक्षा अधिकचे उत्खनन झाल्याचे समजते आहे. तसा अहवालच पथकाने दिला आहे. मात्र, निश्चित किती उत्खनन झाले याचे आकडे हाती आलेले नाहीत. ड्रोन सर्व्हेनंतर हे आकडे हाती येणार असल्याने त्यानंतरच पुढील कारवाईचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा:

Back to top button