Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती | पुढारी

Nashik : सप्तशृंगीगडावरील पाणवठे कोरडे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तसेच कुलदैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या गडावर वनविभागाने मंकी पॉइंट शिवालय तलावाच्या परिसरात लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ठिकठिकाणी पाणवठे बांधले आहेत. मात्र, ऐन उन्हाळ्यात या पाणवठ्यांमध्ये पाणीच साेडले जात नसल्याने ते केवळ शाेभेच्या वास्तू ठरत आहेत.

वन्यजिवांसाठी गडावर पाणवठे बांधले खरे, परंतु त्यात संपूर्ण उन्हाळ्यात आतापर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाणवठ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मार्च, एप्रिल व मे महिना म्हटले की, सप्तशृंगगड ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागतो. अशीच स्थिती प्राण्यांचीही आहे. सध्या परिसरातील तापमान 40 अंशांच्या पुढे जात असताना वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वनविभागाचे कर्मचारी आठवड्यातून एक-दोन वेळा वनपरिसरात भेट देण्यासाठी येतात. परंतु या पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याची तसदी कोणीच घेत नसल्याने ऐन उन्हाळ्यात पानवठे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी, वन्यप्राणी पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वानर गावात पाण्यासाठी वणवण करत फिरताना दिसत आहेत. भटकंती करताना विजेचा शॉक लागून वानराचा मृत्यू झाला आहे.

वनतळ्यासाठी लाखोंचा निधी

दोन ते तीन वर्षांपासून गडावर विविध निधी अंर्तगत लाखो रुपये खर्चून पाच वनतळे बांधली आहेत. मात्र, त्याचे कामही निष्कृट दर्जाचे झाल्याने त्यामध्ये पाणी थांबत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वनतळ्यांचा निधी पाण्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

सप्तशृंगगड हे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून वनविभागाला विविध कामांसाठी लाखाेंचा निधी मिळतो. ये‌थे बांधलेले पानवठे केवळ शोभेच्या वास्तू झालेल्या आहेत.

– प्रकाश कडवे, शहर अध्यक्ष भाजप सप्तशृंगगड

हेही वाचा :

Back to top button