वेदांमधून मिळाले विज्ञानाचे सिद्धांत : एस. सोमनाथ | पुढारी

वेदांमधून मिळाले विज्ञानाचे सिद्धांत : एस. सोमनाथ

उज्जैन : बीजगणित, वर्गमूळ, काळ, स्थापत्यशास्त्र, मेटालर्जीपासून अगदी खगोलशास्त्रापर्यंतचे अनेक सिद्धांत हे मुळात वेदांमधून मिळालेले आहेत. त्यांची माहिती भारतातून अरब देशांच्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांपर्यंत पोहोचली. तेथील वैज्ञानिकांनी हेच सिद्धांत वेगळ्या पद्धतीने सादर करून ते आपलेच असल्यासारखे दाखवले, असे भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे.

उज्जैनमधील महर्षी पाणिनी संस्कृत आणि वैदिक विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. त्यांनी सांगितले, प्राचीन काळातील वैज्ञानिक संस्कृत भाषेचा वापर करीत होते आणि सुरुवातीच्या काळात त्यांच्या संशोधनाचे लिखित दस्तावेज नव्हते. केवळ मौखिक स्वरूपात ही विद्या पुढील पिढीपर्यंत जात होती.

खरे तर या मौखिक परंपरेनेच अजूनही ती सुरक्षित राहिली आहे. वैज्ञानिक विचारांना पुढे नेण्यासाठी संस्कृत भाषेचा उत्तमप्रकारे वापर केला जात होता. कॉम्प्युटरसाठीही संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे. जे लोक कॉम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटलिजन्स शिकू इच्छितात त्यांच्यासाठी संस्कृत भाषा लाभदायक ठरू शकते. संस्कृत भाषेत लिहिलेले भारतीय साहित्य दार्शनिक स्वरूपात अतिशय समृद्ध आहे. संस्कृतमध्ये संस्कृती, धर्म आणि विज्ञान यांच्या अध्ययनात फारसे अंतर नाही.

खगोलशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र आदी विषयांवर संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिण्यात आले. मात्र, त्यांच्यावर अद्यापही फारसे संशोधन झालेले नाही. खगोलशास्त्रावर ‘सूर्य सिद्धांत’ नावाचा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ आठव्या शतकातील असल्याचे मानले जाते. एक रॉकेट वैज्ञानिक म्हणून सांगू शकतो की त्यामधील सौर ऊर्जा आणि टाईम स्केलबाबत जी माहिती आहे ती पाहून मी थक्कच झालो!

Back to top button