सांगली : उतावळा नवरा..गुडघ्याला बाशिंग;लग्नाच्या बाजारात फसलेल्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार | पुढारी

सांगली : उतावळा नवरा..गुडघ्याला बाशिंग;लग्नाच्या बाजारात फसलेल्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

सांगली; नंदू गुरव :  लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उतावळ्या नवर्‍यांना न फसवेल तो आळशी. एकच नवरी, तीन तीन जणांशी लग्न करून रातोरात फरार होते, पण बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशा अवस्थेत अडकलेल्या नवर्‍याला तोंड बांधून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही. भीक नको पण कुत्रं आवर म्हणायची अवस्था त्यांच्यावर आली आहे.

एकाच महिलेचे तीन तीन जणांशी लग्न लावायचे, त्यासाठी नवरदेवांकडून लाखो रुपये उकळायचे, काही दिवस तोंडदेखला संसार करायचा आणि एक दिवस पैसा आडका गुंडाळून पोबारा करायचा..असा लग्नाचा धंदाच दलालांनी मांडला आहे. विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री अशाच एका टोळीचा पर्दाफाश केला..आणि पुन्हा एकदा लग्नातून फसवणुकीचा विषय ऐरणीवर आला.

वसंतगडच्या शंकर बाबूराव थोरात सुलतानगादेच्या वर्षा बजरंग जाधव सोबत हा फसवाफसवीचा उद्योग करत होता. त्याचा पर्दाफाश झाला. लग्नाचा बाजार मांडलेल्या दलालांचे हे प्रताप नवीन नाहीत. लग्न लावून नवरदेवांची 3 लाख 60 हजाराची फसवणूक करणार्‍या टोळीचा इस्लामपूर पोलिसांनी पर्दापाश केला होता. मालेगावनजीक लग्नाचे आमिष दाखवून लग्न लावून देत आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बार्शी भागात तर 200 लग्नाळू पोरांची फसवणूक उघडकीस आली होती. विवाह संकेतस्थळावर वधूच्या मागणीसाठी नाव नोंदणी केलेल्या एका तरूणाला एका भुरट्या तरुणीने संपर्क केला. विवाह करणार असल्याचे खोटे आमिष तरुणाला दाखविले. या माध्यमातून ओळख वाढवून तरुणाकडून महिनाभरात विविध कारणे देऊन 14 लाख 96 हजार रुपये उकळले.

अनेक कारणांनी मुला- मुलींची लग्ने लांबत चालली आहेत. काहीही करून लग्न उरकायच्या नादात असलेली ही मंडळी आपसूक या दलालांच्या जाळ्यात फसतात. या उतावळेपणामुळेच लग्नाचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्याचा धंदा आजकाल जोमात सरू आहे. प्रामुख्यानं मुलं त्यात अडकली आहेत. अशा युवकांना हेरुन त्यांना हातोहात फसवणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मजबुरीचा फायदा घेत, भावनांशी खेळत मुलाला आणि मुलाकडच्या मंडळींना लाखोचा चुना लावणार्‍या या टोळ्यात महिलाही सहभागी आहेत. वर पाहिजेच्या जाहिराती देणार्‍या काही महिला तर पन्नाशीच्या आहेत. सोशल मीडियावरून या जाहिराती देण्यात येतात. सुरुवातीला फक्त फोटो दाखवला जातो आणि पत्ता हवा असल्यास तीन हजार, पाच हजार भरा, असं सांगितलं जातं. या चक्रात मुलं फसत जातात. याविरुध्द पोलिस यंत्रणेनेच जागरुकपणे तपास करण्याची गरज आहे. फसवणूक झालेल्याचं फक्त आर्थिक नुकसानच होतं असं नाही तर त्यांना अपमानाला सामोरं जावं लागतं. ते थट्टेचा विषय बनतात. काहींचं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं. लग्नावरचा विश्वासच उडतो.

समोरच्याला लग्नाची असलेली निकड, त्याच्या उणिवा लक्षात घेऊन या टोळ्या संबंधितांना विविध स्थळं दाखवण्याचा देखावा करतात. फोटो वेगळाच दाखवतात आणि प्रत्यक्षात लग्नात वेगळीच मुलगी आणतात. आपणाला दाखवलं एक आणि निघालं भलतंच हे फसवणूक झाल्यावर लक्षात येते. एकच स्थळ अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम करणं, एकाच स्थळाचा वेगवेगळा बायोडाटा, जन्मपत्रिका, फोटो, नावात थोडाफार बदल करून अनेकांना दाखवणं, लग्न ठरल्याचं सांगत संबंधीतांकडून मोठी रक्कम उकळणं आणि एकदा का रक्कम हातात आली की दाखवलेली मुलगी, स्थळ, दाखवलेले नातेवाईक, मध्यस्थी सार्‍याच जणांचं गायब होणं, असले प्रकार अगदी खेडेगावातही व्हायला लागले आहेत.

यापुढं जाऊन फसवून लग्न लावून दिली जातात. त्याबदल्यात पैसे उकळले जातात. पण काही दिवसातच नवरी गायब होते. आधीच लग्न जमत नव्हतेे, त्यात फसवणुकीचा प्रकार उघड झाला, तर आपलीच बदनामी होईल, परत लग्न जमणार नाही, आपल्याला समोरचा ब्लॅकमेल करेल या भीतीनं प्रकार दडपून जातात.

शुभमंगल म्हणताना सावधान..

शहानिशा केल्याशिवाय, खात्री पाटल्याशिवाय, विश्वासू मध्यस्ताशिवाय लग्न जुळवू नये. जास्तीत-जास्त पुरावे, माहिती, संबंधित लोकांचे फोटो, कागदपत्रे, रजिस्ट्रेशन पडताळून पाहावेत. अशा संस्था, संघटना, व्यक्ती यांचे नोंदणी प्रमाणपत्र, इतर कागदपत्रे मागून घ्यावेत. त्यांनी शिफारस केलेल्या स्थळ अथवा वधू यांचेदेखील जन्मदाखला, फारकत असल्यास त्याचे कागदपत्रे, विधवा-विदूर सांगितले असल्यास त्याचा पुरावा, मुले असल्यास त्यांचे पुरावे तसेच त्या स्थळाचा इतिहास, पार्श्वभूमी जाणून घ्यावी.

कर्नाटक कनेक्शन

लग्नाचे वय उलटून गेले तरी मुलगीच न मिळाल्याने बरेच जण मुलींसाठी कर्नाटक वारी करीत आहेत. परमुलखातल्या या मुलींची, त्यांच्या घरादाराची कसलीही माहिती व्यवस्थितपणे न घेता फक्त लग्न उरकायच्या नादात लग्नाच्या गाठी बांधल्या जातात, पण पुन्हा याच गाठी गळ्याशी येतात. आपली फसवणूक झाल्याचे समजते, पण बोलता येत नाही. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे; पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यापलिकडे काही उपाय करायला लोक तयार होत नाहीत.

Back to top button