’एमबीए’त तंत्रज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रमांवर भर! | पुढारी

’एमबीए’त तंत्रज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रमांवर भर!

गणेश खळदकर

पुणे : मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए अभ्यासक्रमामध्ये आता व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ साधण्यात आला आहे. जगभरातच सध्या तंत्रज्ञानाचा बोलबाला असल्यामुळे एमबीए अभ्यासक्रम शिकविणार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रमांवर भर देण्यात येत आहे. तंत्रज्ञानावर आधारित एमबीए केल्यामुळे विद्यार्थ्यांना भारतातच नव्हे, तर जगभरात नोकरीच्या संधी निर्माण झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

व्यवसाय व्यवस्थापनाच्या तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे एमबीए अभ्यासक्रम अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिकविण्यात येत आहे. यामध्ये मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑपरेशन मॅनेजमेंट यांसारख्या एमबीए अभ्यासक्रमातील पारंपरिक व्यवस्थापकीय शाखांना बहुपर्यायी असे नवनवीन शिक्षण संधी प्राप्त करून देणारे स्पेशलायझेशन उपलब्ध करण्यात आले आहे. एमबीएच्या पारंपरिक फायनान्स विषयाला टेकनॉलॉजीची जोड देऊन फिनटेक असे नवीन स्पेशलायझेशन तसेच मार्केटिंगलासुद्धा टेकनॉलॉजीची जोड देऊन डिजिटल मार्केटिंग असे तंत्रज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.

तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाच्या एकत्रीकरणातून नवीन अभ्यासक्रम

कृषी व्यवसाय, हॉस्पिटल अँड हेल्थकेअर, बिझनेस अ‍ॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, फिनटेक, एज्युटेक, हेल्थटेक, मार्केटिग अँड मार्केटिंग टेक, एचआर टेक, एचआर अ‍ॅटोमेशन, सप्लाय चेन टेक्नॉलॉजी, मेडिकल रोबोटिक्स, मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अशा विषयांना तंत्रज्ञानाची जोड देऊन नवीन अभ्यासक्रम व्यवस्थापन क्षेत्रात तयार करण्यात येत आहेत.

व्यवस्थापनाच्या प्रत्येक क्षेत्रातच आता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपली प्रक्रिया बदलली असून, कंपन्यांचा भर हा आता केवळ तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आहे, त्यांना टेक्नोक्रॅट असे म्हणतात. त्यामुळे तंत्रज्ञानाची जोड घेऊन एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना केवळ भारतातच नाही तर जगभरात मागणी आहे.

       – रमण प्रीत, संस्थापक अध्यक्ष, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

व्यवस्थापन अभ्यासक्रमांना टेक्नॉलॉजीची जोड दिल्याने टेक्नो मॅनेजर्स तयार होण्यास मदत होते. नोकरीच्या दृष्टीने परंपरागत शैक्षणिक पात्रता, अनुभव व व्यक्तिमत्त्व यांच्या जोडीलाच आता प्रगत तंत्रज्ञानाची जोड असणे नितांत आवश्यक आहे. ग्राहकांच्या गरजा व वाढती व्यावसायिक आव्हाने, यामुळे व्यवस्थापन अभ्यासक्रमांना तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित अशा कौशल्याची व अनुभवाची पुढील काळात मोठी गरज भासणार आहे.

                      – प्रा. डॉ. ऋषिकेश काकांडीकर, व्यवस्थापनतज्ज्ञ

Back to top button