सांगली : अनिल बाबर यांना मंत्रिपद? | पुढारी

सांगली : अनिल बाबर यांना मंत्रिपद?

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळणार, अशी अटकळ होती. भाजपकडून आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांचे नाव चर्चेत होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आमदार अनिलराव बाबर यांचे नाव आघाडीवर होते. मंत्रिपदी बाबर यांना संधी मिळणार अशी हवा जोरात होती. मात्र जिल्ह्यातून केवळ सुरेश खाडे मंत्री झाले. दरम्यान पहिल्या विस्तारात केवळ 18 जणांना संधी मिळाली. अनेक इच्छूक नाराज झाले. दुसर्‍या टप्प्यातील विस्तारात संधी मिळेल, या आशेवर अनेकजण आहेत.

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार निर्धास्त झाले. त्यामुळे आता दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना गती आली आहे. 26 ते 31 मे या दरम्यानचा मुहूर्त मंत्रिमंडळ विस्तारासाठी निवडला जाईल, असे संकेत आहेत.
सांगली जिल्ह्यातून खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार अनिलराव बाबर यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, असे राजकीय वातावरण दिसत आहे. आमदार बाबर यांचा विधानमंडळातील कामकाजाचा अनुभव, ज्येष्ठत्व पाहता इच्छुकांमध्ये आमदार बाबर यांचे पारडे जड आहे.

Back to top button