Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत | पुढारी

Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील जैताणे निजामपूर भागात सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. येथील काही शेतकरी ५० ते ६० ट्रॅक्टर एवढे विक्रमी कांदा उत्पादन घेतात.  मात्र उत्पादन कमी झाले की भाव मिळतो आणि उत्पादन जास्त झाले की नेमका कांद्याला भाव नसतो. हे सूत्र जणू काही नेहमीचेच झाले आहे. यावर्षी सर्वच शेतकऱ्यांना कांद्याचे विक्रमी उत्पन्न झालेले आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांद्याचा वांदा झाला असून व्यापान्यांकडून अत्यल्प दरात कांदा खरेदी केली जात असल्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे.

गेल्या वर्षभरापासून साकी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत निजामपूर उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव होत आहेत. शेतकरी मोठया प्रमाणात याठिकाणी कांदा विक्रीसाठी वाहने घेऊन येत आहेत. मात्र त्या प्रमाणात व्यापारी नसल्याने कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे. येथे ४० ते ५० परवानाधारक व्यापारी असून सुद्धा फक्त चार ते पाच व्यापारी याठिकाणी बोली लावून मालाची खरेदी करतात. माल जास्त व खरेदीदार कमी असल्यामुळे मालाचे भाव पडतात. अशावेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद उद्भवतात. अवघ्या एक रुपयांपासून कांद्याला बोली लावल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून शेवाळी नेत्रग राज्य मार्गावर रास्ता रोको करत संताप व्यक्त केला. दोन तासाच्या रास्ता रोकोनंतर बाजार समितीचे नवीन संचालक राजेंद्रभाई शाह व प्रा.रवींद्र ठाकरे यांच्या मध्यस्तीने आंदोलन मागे घेण्यात आले. लिलाव रात्री उशिरापर्यंत करण्यात आले.

नवीन संचालकांकडून अपेक्षा

नुकत्याच पार पडलेल्या साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत निजामपूर गावातून दोन संचालक निवडून आले आहेत. राजेंद्र बिहारीलाल शाह व रविंद्र पोपटराव ठाकरे या दोन्ही संचालकांकडून जनतेस मोठया अपेक्षा आहेत. मार्केटमध्ये सोयी-सुविधांसह व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून निजामपूर उपबाजार समितीचा वर्षांनुवर्षे रखडलेला विकास त्यांनी साधावा अशी अपेक्षा नवीन संचालकांकडून नागरिक करत आहेत.

निजामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त तीनच व्यापारी बोली लावतात व संगनमताने व्यवहार करतात. तसेच येथील व्यापरी बाहेरील व्यापाऱ्यांना बाजार समितीत कांदा खरेदी करण्यासाठी येऊ देत नाहीत. म्हणूनच या ठिकाणी कांद्याला भाव मिळत नाही.
सचिन देवरे, शेतकरी,  छडवेल कोरडे

 

सकाळी नऊ वाजेपासून शेतकरी आपले वाहन घेऊन कांदा विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झालेला असतो. मात्र व्यापारी हे त्यांच्या मनाने पटेल त्या वेळेला येऊन बोली लावतात. याठिकाणी शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही.
-हर्षल सोनवणे, जैताणे

 

बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर गावातील व परिसरातील इतर व्यवसायांमध्ये देखील वाढ झालेली आहे. फक्त कांदा विक्री एवढ्यापुरताच हा विषय नाही तर प्रत्येक घटकाला निजामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहिल्याने फायदा होणार आहे. शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय निर्माण होणे गरजेचे आहे.
-राजेश बागुल, जैताणे

 

साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी सुरू आहे. कांद्याच्या प्रतवारीनुसार भाव दिला जातो आहे. गारपीट व पावसाचा फटका बसल्यामुळे यावर्षी पिकलेला कांदा हा टिकाव धरत नाही. तसेच बाहेरील मार्केटला मागणी नसल्याने भाव मिळत नाही. आमच्या शेडमध्ये कांदा ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. तरी सुद्धा फक्त साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडू नये म्हणून आम्ही नुकसान सहन करून व्यापार सुरू ठेवत आहोत. शेतकऱ्यांनी देखील आमच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे.
-भुषण बदामे, कांदा व्यापारी निजामपूर

हेही वाचा :

Back to top button