श्री क्षेत्र वीर येथे हजारो भाविक; वैशाख अमावास्येनिमित्त घेतले श्री नाथांचे दर्शन | पुढारी

श्री क्षेत्र वीर येथे हजारो भाविक; वैशाख अमावास्येनिमित्त घेतले श्री नाथांचे दर्शन

परिंचे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (दि. 19) वैशाख अमावास्येनिमित्त वीर आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी श्री नाथांच्या दर्शनाकरिता गर्दी केली होती. आज शनेश्वरांची जयंती असल्यामुळे व कालभैरव शनेश्वरांचे आराध्य असल्यामुळे पुणे जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यांतूनही श्री नाथांच्या दर्शनासाठी भाविक आले होते.

नेहमीप्रमाणे श्रीक्षेत्र वीर येथे कोडीतहून अनेक भाविक-भक्तांनी या भरउन्हातही पायी वारी चुकवली नाही. अनेक भाविक भक्तांनी श्री क्षेत्र वीर येथे दर्शनाला आल्यानंतर श्री नाथांचे मूळ ठिकाण श्री घोडे उड्डाण या ठिकाणीही जाऊन श्री नाथांचे मनोभावे दर्शन घेतले. श्री क्षेत्र वीर येथे अवकाळी पाऊस व खराब हवामानापासून तसेच अतिउष्णतेपासून पिकांना वाचवण्याचे शेतकर्‍यांनी श्री नाथांना साकडे घातले.
वीर आणि संपूर्ण परिसर गुलालमय होऊन ‘सवाई सर्जाचं चांगभलं’ चा जयघोषात दणाणून गेला होता.

पहाटे 4.30 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी 6 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी 10 वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. आलेल्या भाविक-भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला.

ट्रस्टकडून भाविकांची काळजी

यंदाचा उन्हाळा अतिशय कडक असला, तरी सर्व भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आली आहे, असे ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी या वेळी सांगितले. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, सॅनिटायझर, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, वाहतूक पोलिस आदींचे नियोजन करण्यात आले होते. या वेळी ट्रस्टचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, सचिव, खजिनदार, सर्व विश्वस्त मंडळ, सल्लगार मंडळ, ट्रस्टचे कर्मचारी आदींनी ट्रस्टतर्फे व्यवस्था पाहिली.

Back to top button