

दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील
यांत्रिकी युगामुळे ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक परंपरागत व्यवसाय करणारे मजूर हे उपासमारीच्या वाटेवर आहेत. त्यामध्ये असाच एक व्यवसाय म्हणजे पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार करणारा व्यवसाय हा जवळजवळ इतिहासजमा होत चालला आहे.
लग्न असो वा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक होते. पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत. मात्र आता सर्वत्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्राच्या सहाय्याने प्लास्टिक व थर्माकोल पत्रावळी, द्रोण, ग्लास, चहा-कप तयार केले जात आहेत. या पत्रावळी माफक भावात उपलब्ध असल्याने पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी, द्रोण, कालबाह्य होत असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरातही दिसून येत आहे. ग्रामीण भागात विशेषत: कोकण भागात एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून पत्रावळी व्यवसायाकडे पाहिले जायचे. त्यासाठी विशिष्ट झाडांच्या पानांचा उपयोग होत असत. त्यामध्ये मोह, पळस या झाडांच्या पानांचा पत्रावळी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असे. या पत्रावळीवर केलेले जेवण नागरिकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे. ग्रामीण भागातील पत्रावळी तयार करणारे मजूर सकाळी लवकर उठून जंगलात जायचे व या झाडाची पाने खुडून आणायचे व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण या आणलेल्या पानांपासून पत्रावळी तयार करण्यासाठी लगबग करायचे.
कलेचा आविष्कार
एक व्यक्ती दिवसभर साधारणपणे १५० ते २०० पत्रावळी तयार करत असत. यातून त्यांना कामांचा योग्य प्रमाणात मोबदला मिळत असे. मात्र यासाठी मोठी मेहनत करावी लागत असे. हाताच्या बोटावर ही कला अवलंबून असल्याने हात दुखत असत. तसेच वेळही भरपूर लागत असे. या पानांच्या पत्रावळी तयार करून व विक्री करून असंख्य कुटुंबांची उदरनिर्वाह व उपजीविका यावर चालत असे. तयार झालेल्या पत्रावळी विशिष्ट संख्येत एकत्र करून ते शहरातील बाजारपेठेत विकल्या जायच्या. यातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत.
प्लास्टिकमुळे पर्याय
आता विज्ञानयुगात विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने पत्रावळीही यंत्राच्या साहायाने प्लास्टिकच्या पत्रावळी व द्रोण अत्यंत कमी वेळेत व कमी किमतीत तसेच विविध रंगांत उपलब्ध होतात. त्यामुळे पत्रावळी तयार करून आपला प्रपंच चालविणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर काहींना दुसऱ्या व्यवसायाकडे वळावे लागले आहे. तरीही आज शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा पानाच्या पत्रावळी दिसून येत नाही. त्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता पानांपासून पत्रावळी तयार करणाऱ्या मजुरांवर एक प्रकारे उपासमारीची वेळ आल्याने या मजुरांना शासनाने नवीन व्यवसाय करण्यासाठी नवनवीन योजना निर्माण करून द्यावेत. जेणेकरून मजुरांचे अश्रू पुसले जातील.
…..संतोष रहेरे, मा. सरपंच अंबानेर, ता. दिंडोरी
हेही वाचा :