मुंबई : येरवडा कारागृहातील कैद्यांना मिळणार स्मार्ट कार्ड फोन | पुढारी

मुंबई : येरवडा कारागृहातील कैद्यांना मिळणार स्मार्ट कार्ड फोन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  येरवडा कारागृहातील कैद्यांना आता कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी स्मार्ट फोन मिळणार आहे. त्यामुळे कारागृहातील जुने कॉईन बॉक्स आता इतिहासजमा होतील.

राज्यातील कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी एमटीएनएल बीएसएनएल कंपनीच्या कॉईन बॉक्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र सध्या बाजारात सहजासहजी कॉईन बॉक्स उपलब्ध नाहीत. शिवाय कॉईन बॉक्स नादुरुस्त झाल्यावर त्याची दुरुस्ती करून मिळत नाही. तसेच ज्या कैद्यांना अतिसुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात आले आहे, अशा कैद्यांना दूरध्वनीचा वापर करण्यासाठी कॉईन बॉक्स बसवण्यात आलेल्या ठिकाणी न्यावे लागते. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कैद्यांना दूरध्वनी सुविधा देताना कॉईन बॉक्स ऐवजी साधे मोबईल फोन वापरण्यास परवानगी देण्याची विनंती राज्यातील काही कारागृह अधीक्षकांनी पुण्याचे अप्पर पोलिस महासंचालक व कारागृह निरीक्षकांना केली होती.

त्यानंतर तामिळनाडू येथील  अॅलन ग्रुपने स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून स्मार्टकार्ड फोनचा वापर येरवडा तुरुंगात प्रायोगिक तत्वावर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस मान्य करण्यात आली आहे. या सुविधेचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

Back to top button