गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो, चर्चेला उधाण | पुढारी

गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर झळकला शरद पवार, अजित पवारांचा फोटो, चर्चेला उधाण

जळगाव : भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. पण काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनरबाजी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी होर्डींग लावले आहेत. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या शुभेच्छा जाहिरातीची अधिक चर्चा होत आहे.

मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात महाजन यांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचे फोटो आहेत. यात विशेष म्हणजे या जाहिरातीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो आहे. यात अजित पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. आणि अजित पवारांच्या फोटोखाली ‘जिवाभावाचा माणूस’, असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच जाहिरातीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे. पवार-मोदींच्या फोटो खाली अजित पवार, फडणवीस आणि मंत्री महाजन यांचा तिघांचा एकत्रित फोटोही छापण्याता आला आहे.

मंत्री महाजन यांचे आवाहन
मंत्री गिरीश महाजन यांनी वाढदिवसानिमित्त एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले की, “यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर, उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यामुळे यंदा माझ्या वाढदिवसाला कोणताही कार्यक्रम घेऊ नये, तसेच जाहिरातबाजी करू नये. राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, कुणाला काही कार्यक्रम करायचेच असतील तर रक्तदान संकलन करा. मी यंदाच्या वाढदिवसाला बाहेरगावी असलो तरी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे माझ्या सोबत कायम असतील. याच्या बळावरच मी आजवर वाटचाल केल्याचे गिरीश महाजन यांनी नमूद केलं आहे.

हेही वाचा :

Back to top button