संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील एका कृषी पर्यवेक्षकाचे त्यांच्या स्पोर्ट्स ग्रुपवर कार्यालयीन महिलेसोबत काही अश्लील फोटो पडले. सदर फोटो थेट पत्नीपर्यंत पोहचले. यातुन दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी दि.16 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पती- पत्नीत झालेला हा वाद थेट पोलिस दरबारात येऊन ठेपला. यात कृषी पर्यवेक्षकाच्या पत्नीने थेट संगमनेर शहर पोलिस ठाणे गाठुन कृषी पर्यवेक्षक पतीविरुद्ध फिर्याद दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यलयात चौकशी प्रस्ताव पाठविला आहे. संगमनेर तालुक्यातील एक कृषी पर्यवेक्षकाचा काही दिवसांपूर्वी शिक्षक महिलेबरोबर विवाह झाला होता. त्यांचा संसार सुरळीत सुरु असताना कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातील एका महिलेसोबत 'हाय, हॅलो,' चॅटिंग सुरू झाली. हा कृषी पर्यवेक्षक वारंवार वादग्रस्त ठरला.
तीन वर्षांपूर्वी याच कृषी पर्यवेक्षकाने सोशल मिडीयाच्या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ टाकले होते. त्यावेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकार्यांनी त्या घटनेवर पडदा टाकला होता. त्यानंतर पुन्हा दीड वर्षांपूर्वी कार्यालयीन अधिकृत ई-मेलवर अश्लील व्हिडीओ टाकले होते. तेव्हा चौकशी देखील झाली होती. तरी कुठलीही कारवाई झाली नाही. ही तक्रार तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर व विभागीय कृषी सहसंचालक, पुणे येथे केली होती. त्यानंतर विशाखा समितीने चौकशी देखील केली होती. तो चौकशी अहवाल विभागीय कृषी सहसंचालक, पुणे येथे सादर केला आहे. इतके सर्व असताना या सराईत माथेफेरु कृषी पर्यवेक्षकाने आज पुन्हा आपलेच अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे, कृषी विभाग या कृषी पर्यवेक्षकावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.