नाशिक : श्री सप्तशृंगी देवी मंदिर सभामंडप जीर्णोद्धारसाठी ११ लाखांची देणगी | पुढारी

नाशिक : श्री सप्तशृंगी देवी मंदिर सभामंडप जीर्णोद्धारसाठी ११ लाखांची देणगी

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

श्री साईबाबांचे भक्त असलेले गर्ग कुटुंबीय हे काही दिवसांपूर्वी श्री भगवती दर्शनासाठी दिल्लीवरुन नाशिक येथे आले असताना विश्वस्त ॲड दीपक पाटोदकर यांनी त्यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवा सुविधांची प्राथमिक माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी श्री भगवती सेवेत काहीतरी योगदान देणे बाबत इच्छा व्यक्त केली असता त्यांच्यासोबत समन्वय साधण्यात आला. यामध्ये गर्ग परिवाराने श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ११ लक्ष रुपयांचे दान देत अनोखे दातृत्व दर्शविले आहे.

आज रविवार, (दि. १४) गर्ग सहकुटुंबाने श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे भेट दिली. त्यानंतर श्री भगवतीची आरती करून रु. ११ लक्ष रकमेचा धनादेश विश्वस्त ॲड दीपक पाटोदकर यांच्याकडे पूर्व संकल्पनेच्या संदर्भासह सुपूर्त केला. याप्रसंगी गर्ग परिवाराला भक्तनिवास, प्रसादालाय तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधेची माहिती दिली असता त्यांनी भक्तनिवास व प्रसादालयातील अद्यावत तंत्रज्ञान आधारित प्रक्रिया व सेवा सुविधेसह संस्थेच्या व्यवस्थापन व प्रशासन कामकाज तसेच समन्वयाचे विशेष कौतुक करून भविष्याकाळात श्री सेवेत तांत्रिक व यांत्रिकीकरण आधारित विशेष यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची इच्छा दर्शविली. याप्रसंगी गर्ग परिवाराचा सन्मान विश्वस्त संस्थेच्या वतींने करण्यात आला. यावेळी विश्वस्त ॲड पाटोदकर, ॲड महेंद्र जानोरकर, अश्विन शेटे, कमलाकर गोडसे, बाळा कोते यांसह विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, मंदिर पर्यवेक्षक प्रशांत निकम आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button