पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील शुभविवाहांसाठी वरदान ठरलेली सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या तुरळक प्रमाणात सामुदायिक विवाह सोहळे होताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्यांची बदललेली आर्थिक स्थिती, सुसज्ज कार्यालयांमध्ये विवाह करण्यासाठी वाढता कल यामुळे भविष्यात सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ केवळ नावापुरती उरेल, असे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील उत्तर भागात खेड, जुन्नर आणि आंबेगाव-शिरूर या तालुक्यांमध्ये खर्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ 35 वर्षांपूर्वी सुरू झाली. सन 2010 पर्यंत सामुदायिक विवाह सोहळे या परिसरातील गावागावांत मोठ्या थाटामाटात व्हायचे. परंतु मागील दहा वर्षांत ग्रामीण भागात देखील सुसज्ज वातानुकूलित मंगल कार्यालये मोठ्या प्रमाणावर थाटली गेली, तसेच शेतकरीदेखील सधन झाल्यामुळे आपापल्या मुला-मुलींचे शुभविवाह हे सुसज्ज अशा मंगल कार्यालयातच करू लागले आहेत. कोरोनाच्या संकटाअगोदर 2020 पर्यंत थोड्याफार प्रमाणावर गावांमध्ये सामुदायिक विवाह सोहळे पार पडायचे, परंतु कोरोनाच्या संकटानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
त्या काळात गावागावांमध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यांच्या समित्या, संस्था कार्यरत होत्या. परंतु आता या संस्था, समित्या बरखास्त झाल्या आहेत. राज्य शासनाकडून देखील सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणार्या लग्नमालकांना अनुदान दिले जायचे, त्याचाही बहुतांशी गोरगरीब कुटुंबांना लाभ झालेला आहे. परंतु काळाच्या ओघात गोरगरिबांच्या कुटुंबांसाठी वरदान ठरलेली ही सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ अखेरची घटका मोजत आहे.
आजही समाजातील काही कुटुबांना आपल्या मुला-मुलींची लग्ने परिस्थितीअभावी सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये करण्याची इच्छा दिसून येते. सामुदायिक विवाह सोहळे होत नसल्याने अशा गोरगरीब कुटुंबांची मोठी पंचाईत होत आहे. त्यामुळे गावोगावच्या सामुदायिक विवाह सोहळा संस्था, समित्यांनी पुन्हा सामुदायिक विवाह सोहळा चळवळ सुरू करणे गरजेचे आहे. देवस्थान ट्रस्ट यांनीदेखील ही चळवळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
– शिवाजीराव लोंढे, अध्यक्ष, भार्गवराम सामुदायिक विवाह संस्था, वळती.