नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित | पुढारी

नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी - डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मखमलाबाद येथे स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारत भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, अ‍ॅड. राहुल ढिकले, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. सांगळे, नाशिकचे प्रकल्प अधिकारी जतिन रहमान आदी उपस्थित होते. रोजगाराच्या शोधात येणारे मजूर व इतर विविध कामांसाठी आदिवासी बांधव शहरात येतात. त्यांच्या निवार्‍याची सोय होण्यासाठी या स्वीकार तथा संशोधन केंद्राचा उपयोग होणार आहे. या केंद्रात तात्पुरत्या निवार्‍यासोबतच मजुरांना भोजन तयार करण्यासाठी व्यवस्थाही करावी. शहरातील विविध भागांत कामानिमित्त येणार्‍या आदिवासी बांधव, मजूर व विद्यार्थ्यांसाठी निवारागृहे उभारण्यासाठी सर्वेक्षण करून स्थळे निश्चित करण्याच्या सूचना डॉ. गावित यांनी दिल्या.

आदिवासींची सुरक्षितता गरजेची : झिरवाळ
आदिवासी बांधव शिक्षण व रोजगारानिमित्त शहरात येतात. त्यावेळी त्यांच्या निवार्‍याच्या व्यवस्थेसोबतच त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सजगता बाळगण्याबाबत उपाययोजना व प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेऊन प्रयत्नपूर्वक नियोजन करावे, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

हेही वाचा:

Back to top button