औषधी वनस्पतींना आता येणार अच्छे दिन; महाराष्ट्रासह चार राज्ये व दोन केंद्र शासित प्रदेशात होणार लागवड | पुढारी

औषधी वनस्पतींना आता येणार अच्छे दिन; महाराष्ट्रासह चार राज्ये व दोन केंद्र शासित प्रदेशात होणार लागवड

अलिबाग; जयंत धुळप : केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळाचे पश्चिम विभागीय सुविधा केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान ही चार राज्ये आणि दादरानगर हवेली व दिव-दमण हे दोन केंद्र शासित प्रदेश यांमध्ये औषधी वनस्पतींची व्यापारी तत्वावर लागवड आणि लागवडीअंती औषधी वनस्पतींची खरेदी अशी शेतकऱ्यांची खात्रीने आर्थिक उन्नती साध्य करणारी योजना यंदा पासून अमलात येत आहे.

या योजनेंतर्गत विविध सुमारे शंभर प्रकारच्या औषधी वनस्पतींची रोपे राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळाच्या माध्यमातून प्रथम या प्रथम घ्या अशा तत्वावर मोफत देण्यात देण्यात येणार असल्याचे या योजनेचे आयूष मंत्रालयाचे क्षेत्रीय संचालक तथा सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिगंबर मोकाट यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगीतले.

पारंपरिक औषधी वनस्पती यांची मागणी औषध निर्मीती उद्योगांकडून मोठ्या प्रमाणावर आहे. परंतू त्या मागणीची पूर्तता होत नाही. त्याच बरोबर जंगलातून पारंपरिक पद्धतीने औषधी वनस्पतींचे संकलन करणाऱ्यांचे प्रमाण देखील मर्यादित स्वरुपात आहे. जंगलातून औषधी वनस्पती संकलीत करुन त्या औषध निर्मीती उद्योगांना देणाऱ्या सद्यस्थितील या पारंपरिक औषधी वनस्पती संकलकांना अपेक्षेप्रमाणे त्यांचा मोबदला देखील मिळत नाही. दुसरा भाग म्हणजे औषधी वनस्पतींच्या या विक्रीकरिता औषधी वनस्पती जंगलांतून ओरबाडल्या जातात परिणामी जगंलांचा देखील -हास होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान औषधी वनस्पतींच्या या लावडीमुळे वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याने त्याचा पर्यावरण सवर्धनाकरिता मोठा हातभार देखील लागणार या सर्व मुद्यांचा विचार करुन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आता औषधी वनस्पती लागवडीची एक नवी चळवळच उभी करण्यात येत असून त्यांतून लाखो शेतकरी आणि जंगलाशी निगडीत लोक समुहांना सातत्यपूर्ण अर्थांजनांचे अधिकृत साधन देखील उपलब्ध होणार असल्याची विश्वास डॉ. दिगंबर मोकाट यांनी व्यक्त केला आहे.

ही लागवड शासनाच्या सार्वजनिक जमीनींवर देखील करता येणार आहे, त्यातून प्राप्त होणारा लाभ संबंधीत लागवडकर्त्या शेतकऱ्यास मिळाणार आहे. किमान एक एकर क्षेत्रात ही लागवड होणे अपेक्षीत आहे. एका शेतकऱ्यांकडे एक एकर क्षेत्र नसेल तर शेतकरी समुहांना एकत्र येऊन ही लागवड करता येणार आदरम्यान ज्यांना ही औषधी वनस्पतींची रोपे हवी आहेत त्यांनी आपले मागणीपत्र २५ मे २०२३ पूर्वी जमीनीच्या उताऱ्यांच्या नकलेसह rcfc.wr. sppu@gmail.com येथे ईमेल करणे गरजेचे आहे. असल्याचेही डॉ. मोकाट यांनी सांगीतले

Back to top button