संगमनेर बाजार समिती ; सभापती, उपसभापती पदांचा होणार आज फैसला | पुढारी

संगमनेर बाजार समिती ; सभापती, उपसभापती पदांचा होणार आज फैसला

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरिता आज (शुक्रवारी) निवड होणार आहेत. दरम्यान, सभापती पदी माजी सभापती शंकर खेमनर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, मात्र उपसभापती पदासाठी काही गावांची नावे चर्चेत आहेत. सभापती व उपसभापतीपदी कोणाला बसवायचे याचे सर्वस्वी अधिकार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. यामुळे ते नेमकं कुणाची वर्णी लावतात, याकडे सर्व संचालकांचे लक्ष लागले आहे. संगमनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवड नुवडणुकीमध्ये मतदारांनी विरोधकांचा पुर्णतः पराभव करून त्यांचा पराभव करीत माजी मंत्री आ. आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवत प्रचंड मतांनी विजयी केले. संगमनेर बाजार समितीत नव्याने निवडून आलेल्या 17 संचालकांमधून पुढील 5 वर्षांसाठी सभापती व उपसभापती पदासाठी आज निवड होणार आहे.

आ. बाळासाहेब थोरात यांनी मागील पाच वर्षांपूर्वी शंकर खेमनर यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठेवत त्यांनी सभापती म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे आ. थोरात हे पुन्हा सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकण्याची शक्यता आहे.
शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार महेंद्र गुंजाळ यांचा पराभव करून अपक्ष सचीन कर्पे विजयी झाले. त्यांनीसुद्धा आ. थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळामध्ये प्रवेश केला. यामुळे सर्व संचालक शेतकरी विकास मंडळाचे या बाजार समितीत आहेत. त्यांच्यामधून अनेकजण उपसभापती पदासाठी इच्छुक आहेत, मात्र आ. बाळासाहेब थोरात हे चर्चेतील चेहर्‍याला संधी देतात की, चर्चेत नस लेल्या दुसर्‍याच एखाद्या नव्या चेहर्‍याला संधी देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Back to top button