Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट | पुढारी

Nashik : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर वीजकपातीचे सावट

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सोळा गाव पाणीपुरवठा योजनेपोटी या महिन्यात 13 लाख रुपयांचे लाइट बिल आले असून, 16 लाख अनामत रक्कम असे 29 लाख रुपयांचा भरणा १२ मेपर्यंत करावयाचा आहे. लाइटबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, तसे झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची टांगती तलवार योजनेवर आहे. यास 16 गाव पाणीपुरवठा लाभार्थी गावांच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची लासलगाव येथे बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विस्कळीत पाणीपुरवठा योजनेसह थकीत वीजबिलाचा मुद्दाही त्यात चांगलाच गाजला. पाणीपुरवठा योजनेच्या या स्थितीबद्दल कोणताही निर्णय न होता सदस्यांनी काढता पाय घेतला.

सतत होणाऱ्या पाइपलाइनच्या लिकेजमुळे पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यात समितीचे सचिव शरद पाटील यांनी भाकरी फिरवण्याची गरज असून, आपण या पदातून लवकरच मुक्त होणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी लाभार्थी गावातील अन्य ग्रामसेवकाची निवड करावी असे सांगितले. परंतु सचिवपद घेण्यास कोणताही ग्रामसेवक तयार नाही. पाटील यांनीच यापूर्वी पाच वेळा राजीनामा दिला असून, तो मंजूर केला जात नसल्याचे समजते. दरम्यान, गुरुवारी (दि. ११) चार वाजता नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात 16 गाव पाणीपुरवठा समितीची बैठक होणार आहे.

या बैठकीला 16 गाव समितीचे सचिव शरद पाटील, पिंपळगाव नजीक सरपंच काशीनाथ माळी, उपसरपंच हिरामण घोडे, कोटमगाव सरपंच आरती कडाळे, उपसरपंच योगेश पवार, टाकळी विंचूर उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे, विंचूर ग्रामसेवक जी. टी. खैरनार, ब्राह्मणगाव विंचूर ग्रामसेवक डी. टी. साळुंखे, निमगाव वाकडा ग्रामसेवक योगेश बत्तीसे, कोटमगाव ग्रामसेवक एस. एस. धिवर उपस्थित होते.

Back to top button