अधिकार्‍यांनो, शेतकर्‍यांचा बळी देवू नका ! खरीप आढावा बैठकीत आ. आशुतोष काळे यांचे कृषी विभागाला निर्देश | पुढारी

अधिकार्‍यांनो, शेतकर्‍यांचा बळी देवू नका ! खरीप आढावा बैठकीत आ. आशुतोष काळे यांचे कृषी विभागाला निर्देश

कोळपेवाडी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : अस्मानी संकट शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयार नाही. उन्हाळ्यात देखील होणार्‍या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. तरीदेखील नुकसानीला न घाबरता नुकसान सोसून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीस लागला आहे. त्यामुळे शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामात शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील, याचे योग्य नियोजन करा. अधिकार्‍यांच्या बचावासाठी शेतकर्‍यांचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्या, अशा शब्दांमध्ये आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला निर्देश दिले. कोपरगाव तहसील कार्यालय येथे आ. काळे यांनी आज बुधवार (दि.10) रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषी अधिकार्‍यांसमवेत खरीप आढावा व नियोजन बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत कृषी विभागाला त्यांनी मार्गदर्शन केले.

आ. काळे म्हणाले, अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या कांदा पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकर्‍यांच्या आशा खरीप हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामात बियाणे व खतांमुळे शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. बोगस बियाणांपासून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक बियाणे व खते शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्राथमिक तपासणी पूर्ण करून वारंवार तपासणी मोहीम राबवावी. खरीप हंगामात सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी आदी बियाणांची कमतरता जाणवणार नाही, याची खबरदारी घेवून शेतकर्‍यांना आवश्यक बियाणे वेळेत उपलब्ध होतील याची खबरदारी घ्यावी.

शासकीय योजनांचा लाभ सर्व समावेशक राहील यासाठी प्रयत्न करा. सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू शेतकर्‍यांना मिळावा यासाठी मार्गदर्शन करून जनजागृती करा. जबाबदारी चोखपणे पार पाडून अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे एकाही शेतकर्‍यांचे नुकसान होणार, नाही यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ. काळे यांनी कृषी विभागास दिल्या. टंचाई व आपत्ती व्यवस्थापन बैठकीबाबत सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. याबाबत लवकर बैठक घेवून पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ. काळे यांनी संबंधित विभागास यावेळी दिल्या.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, गोविंद कुलाळ, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, शोभा गोरे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, राहुल रोहमारे, अनिल कदम, शिवाजी घुले, शंकरराव चव्हाण, बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, खंडू फेफाळे, गोदावरी खोरेचे कार्य. संचालक दिलीप शिंदे, जिनिंग प्रेसिंगचे संचालक संजय संवत्सरकर, भास्कर सुराळे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, मुर्शतपुरचे सरपंच अनिल दवंगे, संजय काळे, राजेंद्र खिलारी, गणेश घुमरे, गणेश घाटे, बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर, कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष सागर कवडे, बाळासाहेब साबळे आदी उपस्थित होते.

Back to top button