नाशिक @40.2 : हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद | पुढारी

नाशिक @40.2 : हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. त्यातच शहरातील तापमानाचा पारा बुधवार (दि. 10) सर्वाधिक म्हणजे ४०.२ अंशांवर गेला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच हा आकडा ४० च्या पार गेल्याने दिवसभर उन्हाच्या झळा नाशिककरांना त्रस्त करत होत्या. उकाड्यात प्रचंड वाढ होत असून नाशिककरांच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाच्या संकटानंतर नाशिकच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शहराच्या तापमानाचा पारा गेल्या ४ दिवसांपासून ३५ अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. आज हाच आकडा ४० च्या पार गेला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या वेळी ओस पडल्याचे चित्र होते. दरम्यान, दुपारच्या वेळेत उष्णतेच्या लहरींचा वेग अधिक असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. परिणामी रस्त्यांवर अघोषित लॉकडाऊनसारखे चित्र पाहायला मिळते आहे. उष्णतेमुळे घर व कार्यालयांमध्ये बसणे मुश्कील झाले आहे. उकाड्यातून सुटका करून घेण्यासाठी सतत एसी, पंखे व कुलर सुरू ठेवले जात आहेत. मात्र, त्यातूनही उष्ण लहरी येत असल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

दरम्यान, उत्तर-मध्य भारतामधील मैदानी प्रदेशात हवेतील आर्द्रता नाहीशी झाल्याने सरासरी तापमानात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे येत्याकाळात उष्णतेची लाट कायम राहिल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button