कर्नाटकात 73 टक्के मतदान | पुढारी

कर्नाटकात 73 टक्के मतदान

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणार्‍या कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी किरकोळ हिंसाचार वगळता 72.69 टक्के मतदान झाले.

मतदान संपताच खासगी संस्था तसेच वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमताच्या आसपास पोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. तर भाजप नव्वदीपर्यंत राहील, अशी शक्यता आहे. विधानसभेच्या एकूण 224 जागा असून, बहुमतासाठी 113 हा जादुई आकडा आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 110 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यता आली आहे. भाजपला 90, तर निधर्मी जनता दलाला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.

राज्यात सर्वाधिक 79.39 टक्के मतदान रामनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी 49.65 टक्के मतदान बेंगळूर दक्षिण मतदारसंघात झाले. बेळगाव जिल्ह्यात 68.54 टक्के मतदान झाले. राज्यात दिवसभरात काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यात बेळगांव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यात व निपाणी तालुक्यातील गळतगा व गजबरवाडी गांवात मशिन बंद पडल्या होत्या. त्यामुळे मतदान लांबले. तेथे सायंकाळी 6 या निर्धारित वेळेनंतरही मतदान घेण्यात आले.

राज्यात सहा ठिकाणी किरकोळ हिंसाचार मतदान शांततेत पार पडले. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील अतिरीक्त ईव्हीएम मशिन घेऊन जाणार्‍या कारवर हल्ला झाला. हल्ल्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनची तोडफोड करण्यात आली. निवडणूक अधिकार्‍यांच्या वाहनांचेही नुकसान केले. अधिकारी यंत्रे बदलून मतदानात छेडछाड करत असल्याची अफवा पसरल्याने हा हल्ला घडला.
पद्मनाभ विधानसभा मतदारसंघाच्या पपया गार्डन मतदान केंद्रावर लाठ्या घेउन कांही तरुणांनी विरोधकांवर हल़्ला केला. या हल्ल्यात मतदान करण्यासाठी आलेल्या कांही महिला जखमी झाल्या. तिसरी घटना बळ्ळारी जिल्ह्यातील घडली. संजीव नारायण कोटे येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

वृध्दाला मदत करताना अधिकार्‍याने दाबले बटण

राज्यात चित्तापूर मतदारसंघातील चामनुरु या गावात मतदान केंद्रातील एका अधिकर्‍याने एका वृध्दाला मदत करण्याच्या बहाण्याने चक्क भाजपाला स्वत: मतदान केल्याची घटना उाडकीस आली आहे. यावेळी आमदार प्रियांक खर्गे यांनी त्या निवडणूक अधिकार्‍याला धारेवर घेत कारवाई करण्याची मागणी केली.

अचानक बैलाचा मृत्यू

हावेरी जिल्ह्यातील हनगल तालुक्यातील मारनबीड गांवात शर्यतीसाठी लोकप्रिय असलेला सुर्यपूत्र नांवाचा बैल मरण पावला. यामुळे मतदान केंद्राकडे न जाता शेकडो गांवकरी दुःखात बुडाले. शेवटी अधिकार्‍यांनी गांवकर्‍यांची मनधरणी करुन मतदान करण्यासाठी भाग पाडले.

मतदानानंतर हृदयविकाराचा झटका

हसन जिल्ह्यातील चिक्कोळे मतदान केंद्रावर मतदान करुन बाहेर येताच जयण्णा (वय 49) नामक मतदाराचा मृत्यू झाला. जयण्णा यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. मात्र मतदान केंद्राबाहेर पडताच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांचा मृत्यू झाला.

जिल्हानिहाय मतदान असे

जिल्हा टक्के
बेळगाव 78.75
कारवार 76.72
बिदर 70.66
विजापूर 70.78
बागलकोट 74.63
धारवाड 71.02
गदग 75.21
बंगळूर ग्रामीण 83.76
बंगळूर अर्बन 56.98
बंगळूर मध्य 55.39
बंगळूर दक्षिण 52.47
बळ्ळारी 76.13
चामराजनगर 80.81
चिक्कबळापूर 84.01
चिक्कमगळूर 77.89
चित्रदुर्ग 80.37
जिल्हा टक्के
मंगळूर 71.61
दावणगिरी 77.47
गुलबर्गा 65.22
हसन 81.59
हावेरी 81.17
कोडगू 74.74
कोलार 80.45
कोप्पळ 77.25
मंड्या 76.73
म्हैसूर 75.04
रायचूर 69.79
शिमोगा 77.22
तुमकूर 83.46
उडुपी 78.46
विजयनगर 77.62
यादगीर 66.66
सरासरी 72.69

Back to top button