धुळे : लाच स्विकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपच्या जाळ्यात | पुढारी

धुळे : लाच स्विकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपच्या जाळ्यात

धुळे; पुढारी वृत्तसेवा : सरकारी विभागाच्या चुकीच्या कामामुळे शेतीच्या सात बारा उताऱ्यावर विहीर नसताना विहीर असल्याची नोंद केल्याचा खळबळ जनक प्रकार शिरपूर तालुक्यातील वकवाड येथे घडल्याची बाब निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे ही खोटी नोंद काढून घेण्यासाठी त्याच शेतकऱ्याकडून पुन्हा पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला आज, मंगळवारी (दि.९) धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील रहिवास असणाऱ्या शेतकऱ्यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. या शेतजमिनीमध्ये विहीर नसताना संबंधित विभागाच्या चुकीमुळे सातबारा उताऱ्यावर विहीर असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला शेत जमिनीमध्ये प्रत्यक्षात खरी विहिरीसाठी शासकीय अनुदान मंजूर होण्यासाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्याने उताऱ्यावरची ही खोटी नोंद काढून घेण्यासाठी शासकीय विभागाच्या कार्यालयामध्ये खेट्या मारणे सुरू होते. मात्र त्याला शासकीय खाबुगिरी दाद देत नव्हती.

दरम्यान या शेतकऱ्याने चुकीने झालेल्या विहिरीची नोंद कमी करण्यासाठी वकवाड येथील तलाठी यांच्याकडे अर्ज केला. यावेळी तलाठी यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी विहिरीची नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेतलेली आहे. सदर नोंद ही मंडळ अधिकारी यांनी मंजूर केल्याशिवाय विहिरीची नोंद कमी होत नसल्याची अडचण निर्माण झाली. संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी वेळोवेळी मंडळ अधिकारी अशोक गुजर यांना भेटून त्यांना विहिरीची नोंद कमी करण्याबाबत फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी विनंती केली. मात्र मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार शेतकऱ्याला शेतजमिनी संदर्भात यापूर्वी केलेल्या हक्क सोडच्या कामाचे बक्षीस म्हणून तसेच सातबारा उताऱ्यावर चुकून झालेल्या विहिरीची नोंद कमी करण्याबाबतची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली.

आधीच शेतावर चुकीने विहिरीची नोंद केल्यामुळे त्रासाला सामोरे जात असताना पुन्हा कोणतीही चूक नसताना मंडळ अधिकारी गुजर यांच्याकडून लाचेची मागणी झाल्यामुळे संबंधित शेतकरी हा हवालदिल झाला. त्यामुळे त्याने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी दोन पंचा समवेत या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या हक्कसोड पत्रकाचे बक्षीस आणि विहिरीची चुकीने झालेली नोंद कमी होण्यासंदर्भात तडजोडी अंती दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम त्याने शिरपूर येथील मिलिंद नगरातील त्याच्या राहत्या घरी घेऊन येण्याचे सांगितले. त्यामुळे मंगळवारी मिलिंद नगरात अशोक गुजर राहत असणाऱ्या घराच्या परिसरात पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा ,रामदास बारेला, भूषण खलाणेकर, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी सापळा लावला.

ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताच मंडळ अधिकारी गुजर याच्यावर साध्या वेशातील पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

Back to top button