Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा | पुढारी

Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त 'इतका' पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. सद्यस्थितीत प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये अवघा ३९ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. अल निनोचे संभाव्य संकट बघता जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

यंदाच्या वर्षी देशावर अल निनोचे संकट घोंगावते आहे. अल निनोचा प्रभाव राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मान्सूनवर हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शासनाने गावपातळीपासून ते राज्यस्तरावर उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. मात्र, एकीकडे पाण्याची काटकसर केली जात असताना जिल्ह्यातील धरणांमधील साठ्यात सातत्याने घसरण होत आहे. त्याचे प्रमुख कारण धरणांमधून दैनंदिन पिण्याच्या पाण्याची होणारी उचल, तसेच सिंचनासाठीचे आवर्तन व बाष्पीभवनाचा वेग यामुळे उपलब्ध साठ्यात घट होत आहे.

जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये सध्या एकत्रित पाणीसाठा २५ हजार ९३० दलघफू इतका असून, त्याचे प्रमाण ३९ टक्के आहे. विशेष म्हणजे निम्म्याहून अधिक प्रकल्पांमध्ये ३० टक्क्यांहून कमी साठा उपलब्ध आहे. गिरणा खोऱ्यातील माणिकपुंज धरण कोरडेठाक पडले असून, नागासाक्यात अवघे ७ टक्के पाणी शिल्लक आहे. वाघाडनेही तळ गाठला असून, त्यात ९ टक्के साठा उपलब्ध आहे. अन्य प्रकल्पांची परिस्थिती काहीशी सारखीच आहे. त्यामुळे अल निनोचे संकट व मान्सून लांबण्याची भीती विचारात घेता पाण्याचे अधिक काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे.

धरणसाठा (दलघफूमध्ये)

गंगापूर 3090, दारणा 4880, काश्यपी 681, गाैतमी-गोदावरी 245, आळंदी 231, पालखेड 197, करंजवण 1505, वाघाड 207, ओझरखेड 609, पुणेगाव 120, तिसगाव 64, भावली 423, मुकणे 3989, वालदेवी 545, कडसा 466, नांदूरमध्यमेश्वर 157, भोजापूर 77, चणकापूर 1279, हरणबारी 607, केळझर 222, नागासाक्या 27, गिरणा 5292, पुनद 1017, माणिकपुंज 00.

हेही वाचा : 

Back to top button