दहावी-बारावी प्रमाणपत्रांची सुरक्षा ऐरणीवर ! बोगस प्रमाणपत्रे वाटणारी टोळी पुण्यात पकडली | पुढारी

दहावी-बारावी प्रमाणपत्रांची सुरक्षा ऐरणीवर ! बोगस प्रमाणपत्रे वाटणारी टोळी पुण्यात पकडली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात मुक्त विद्यालयाची दहावीची बनावट प्रमाणपत्रे देणारी टोळी पकडण्यात आली आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात येत असलेल्या दहावी-बारावीची प्रमाणपत्रे बनावट करून देण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्य मंडळाच्या दहावी-बारावी प्रमाणपत्रांची सुरक्षा ऐरणीवर आली असून, प्रमाणपत्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी-बारावीची परीक्षा घेऊन प्रमाणपत्रे देण्यात येतात. दहावी-बारावीची प्रमाणपत्रे नोकरीपासून ते अनेक शासकीय कामांसाठी गरजेची असतात. यातूनच दहावी-बारावी नापास असलेले विद्यार्थी हेरून त्यांना बनावट प्रमाणपत्रे दिली जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे वर्षभर दहावी-बारावीचा अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य मंडळाकडून देण्यात येत असलेल्या प्रमाणपत्रांच्या सुरक्षेत वाढ करून त्याची बनावटगिरी होणार नाही आणि झाली तरी उघडकीस येईल अशा पध्दतीने प्रमाणपत्रे तयार करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य मंडळाच्या मुक्त विद्यालयात केवळ पाचवी आणि आठवीचेच प्रमाणपत्र दिले जाते. दहावी-बारावीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. पारंपरिक दहावी-बारावीच्या प्रमाणपत्रांवर तब्बल 16 सिक्युरीटी फीचर्स आहेत. त्यामुळे राज्य मंडळासारखी हुबेहूब प्रमाणपत्रे तयार केली जाऊ शकत नाहीत. बनावट प्रमाणपत्रे लगेच उघडकीस येतात.

       – शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

राज्य मंडळामार्फत दहावी-बारावीच्या प्रमाणपत्रांवर होलोग्राम लावण्यात आलेले आहेत. मात्र, झेरॉक्स केल्यानंतर काही समजत नाही. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा धोका टाळण्यासाठी प्रमाणपत्रांवर विद्यार्थ्यांचे फोटो लावण्यात यावेत. तसेच बोगस प्रमाणपत्रे तयार करणार्‍यांवर कारवाईसाठी राज्य मंडळाने पुढाकार घ्यावा.

                      – महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

Back to top button