नाशिक : त्र्यंबकमध्ये वनखात्याचे छापे, सापडली नकली वाघनखे | पुढारी

नाशिक : त्र्यंबकमध्ये वनखात्याचे छापे, सापडली नकली वाघनखे

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ञ्यंबकेश्वर शहरात वन्यप्राणी अवयवांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून राबविलेल्या छापासत्रात वाघाची नखे व दात, रानडुकराचे दात व नखे, कस्तुरी यासह प्राणी व पक्षी यांचे नकली अवयव सापडले. नागरिक आणि भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी हा सर्व नकली साठा जप्त करण्यात आला आहे.

दुपारच्या वेळेत गन घेतलेले वनखात्याचे गणवेशधारी कर्मचारी फिरताना पाहून शहरात बिबटया घुसल्याची अफवा पसरली. ञ्यंबकेश्वर येथे वाहनतळ, मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ चौक, पोस्ट गल्ली या ठिकाणी रुद्राक्ष, शंखमाळा विक्रेते बसतात. त्यांच्याकडे वाघाची नखे व दात, रानडुकराचे दात व नखे, कस्तुरी यासह प्राणी व पक्षी यांच्या अवयवांची चोरून व्रिकी केली जात असल्याची माहिती वनखात्याला मिळाली होती. ञ्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनअधिकारी अरुण निंबेकर यांनी शोधमोहीम राबवली. शहरातील आठ व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करत पंचनामा करत वन्यजीवांसंदर्भातील संशयास्पद वस्तू जप्त केल्या. त्याची बारकाईने तपासणी केली असता त्या नकली असल्याचे निदर्शनास आले. भाविकांची फसवणूक होऊ नये, याकरिता सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. शोधमोहिमेत वनाधिकारी अरुण निंबेकर यांच्या समवेत रवींद्र मौळे, कैलास महाले, रत्ना तुपलोंढे, जिजा कनोजे, रोहिणे थोरे, बबलू दिवे, संतोष बोडके, नाना कडू, माउली दुरगुडे, कचनर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

काही दुकानदार अज्ञातस्थळी

दरम्यान, माळा आणि शंखविक्रेत्यांना शोधमोहिमेची माहिती मिळताच आपल्या साहित्यासह ते निघून गेले. मंदिरासमोरचा रस्ता नेहमी या व्यावसायिकांनी व्यापलेला असतो. तो दुपारनंतर सुनसान झाला होता.

हेही वाचा :

Back to top button