मैत्रिणीनेच मैत्रिणीला घातला 69 लाखांचा गंडा; पुण्यातील प्रकार | पुढारी

मैत्रिणीनेच मैत्रिणीला घातला 69 लाखांचा गंडा; पुण्यातील प्रकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका मैत्रिणीने दुसर्‍या मैत्रिणीला कर्ज काढायला भाग पाडून कर्जाचे हप्ते न फेडल्याने तब्बल 69 लाखाला गंडा घातला आहे. पीडित मैत्रिणीला दर महिन्याला 1 लाख 70 हजारांचा कर्जाचा हप्ता पडत आहे. तिने काही कर्जाचे हप्ते कसेबसे फेडले. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्याने ती मैत्रिणीकडे, तिच्या आई-वडिलांकडे आणि बहिणीकडेही दाद मागण्यास गेली. मात्र, तिला मैत्रिणीच्या आई-वडिलांनी मारहाण केली, तर बहिणीने संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणी शशीकांत लोणकर (34), शशीकांत वसंत लोणकर( 56), समिधा शशिकांत लोणकर, ऋतीका लोणकर, सुशील लोणकर, उत्तम शेळके अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्या नोकरी करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची कल्याणी ही मैत्रीण असून, एकाच सोसायटीत दोघी राहायच्या. कल्याणीने फिर्यादीला माझे वैवाहिक जीवन संपुष्टात येत आहे. मी खूप अडचणीत येत आहे. मला तातडीने 50 ते 60 लाखांची गरज असून, मला आर्थिक मदत कर. मी कर्जाचा हप्ता नियमित भरत जाईल, असा तगादा लावला होता.

पीडितेने सुरुवातीला इतके कर्ज मिळणे शक्य नसल्याचे सांगितले होते. मात्र, कल्याणीने उत्तम शेळके हा नॅशनल बँकेचा सेलिंग एजंट असल्याचे सांगत त्याला कागदपत्रे देण्यास भाग पाडून तब्बल 80 लाखांचे कर्ज पीडितेच्या नावावर काढले. यातील 48 लाख 4 हजार रुपये कल्याणीने फेडले. उरलेले पैसे देत नसल्याने पीडितेचे हप्ते थकत गेले. फिर्यादीने राहिलेले पैसे परत मागितले असता, त्यांना धमकाविण्यात आले. याबाबत फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर करत आहेत.

Back to top button