टवाळखोरांना दंडुक्याचा ‘प्रसाद’ ; शहरातील दुचाकीचोर, अट्टल गुन्हेगार कोतवाली पोलिसांच्या रडारवर | पुढारी

टवाळखोरांना दंडुक्याचा ‘प्रसाद’ ; शहरातील दुचाकीचोर, अट्टल गुन्हेगार कोतवाली पोलिसांच्या रडारवर

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरा बसस्थानक परिसरात, तसेच शहरात इतरत्र विनाकारण फिरणार्‍या टवाळखोर व गुन्हेगारांना ‘खाकी’चा हिसका दाखविण्यासाठी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव रस्त्यावर उतरले असून, त्यांनी चोवीस तास पहारा देण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौकाचौकात रात्री उशिरा फिरणार्‍यांची कसून चौकशी केली जात आहे. गुरुवारी रात्री (दि.4) पुणे बसस्थानक परिसरात उघड्यावर दारू पिणार्‍या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. तसेच, गेल्या आठवड्यात पोलिसांनी रात्री उशिरा एका व्यक्तीकडून तलवार जप्त केली होती.

विनाकारण मोटरसायकलवरून फिरणार्‍यांची चौकशी केली जात असून, संशयास्पद वाहनांची झडती पोलिस घेत आहेत. या मोहिमेत काही मोबाईलचोर, मारहाण करून लुटणारे गुन्हेगारही हाती लागले आहेत. संशयितरित्या फिरणार्‍या तीन चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मोबाईल हिसकावणाल्या एकाला अटक केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणार्‍या नऊ जणांवर कारवाई केली आहे. निरीक्षक यादव स्वतः अन्य अधिकारी आणि पोलिस जवानांसह रात्री उशिरापर्यंत गस्त घालत आहेत.

पोलिस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पिंगळे व विवेक पवार, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, मनोज कचरे, मनोज महाजन, सुखदेव दुर्गे, पोलिस अंमलदार योगेश भिंगारदिवे, तनवीर शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, रियाज इनामदार, गणेश धोत्रे, संदीप थोरात, प्रमोद लहारे, कैलास शिरसाठ, सलीम शेख, अनुप झाडबुके, ईश्वर थोरात, राहुल शेळके, सुमित गवळी, अशोक कांबळे, शरद धायगुडे, राजेंद्र पालवे, बिल्ला इनामदार, अशोक भांड, शरद धायगुडे, प्रशांत बोरुडे या कारवाईत सहभागी झाले आहेत.

रात्री 11 नंतर दुकाने बंद !
दुकाने, हॉटेल, टपर्‍या रात्री 11 नंतर उघडे दिसल्यास कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या 62 लहान-मोठ्या आस्थापनांवर कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

महिला, सर्वसामान्यांकडून कारवाईचे स्वागत
कोतवाली पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. टवाळखोरांवर कारवाई करण्यात आल्याने महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होत असल्याने या कारवाईचे स्वागत होत आहे.

त्रास देणार्‍यांची माहिती द्या : चंद्रशेखर यादव
कोतवालीच्या हद्दीत विनाकारण रात्रीच्या वेळी गोंधळ घालणारे, उघड्यावर मद्यपान करणार्‍यांची माहिती देण्याचे आवाहन चंद्रशेखर यादव यांनी नागरिकांना केले आहे. विनाकारण त्रास देणार्‍यांचा ‘बंदोबस्त’ केला जाईल, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

Back to top button