बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार

बुद्ध पौर्णिमा विशेष : श्रीलंकेतील बोधिवृक्षाची फांदी नाशिकच्या बुद्धस्मारकात स्थापित होणार

नाशिक : नितीन रणशूर

राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना वयाच्या ३५ व्या वर्षी बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली ४९ दिवस ध्यानसाधना केल्यानंतर ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे बौद्ध धर्मात बोधगया आणि त्याठिकाणच्या पिंपळ वृक्ष अर्थात बोधिवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच २३०० वर्षे जुन्या बोधिवृक्षाच्या कक्षा नाशिकमधील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धस्मारकाच्या आवारात रुंदावणार आहेत. त्यामुळे या स्मारकाच्या सौंदर्यात आणि पावित्र्यात आणखी भर पडणार आहे.

बोधगया येथील भगवान गौतम बुद्ध यांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली 'बुद्धत्व' प्राप्त झाले, त्या वृक्षाला 'बोधिवृक्ष' (ज्ञानाचा वृक्ष) म्हणून ओळखले जाते. २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांच्या माध्यमातून श्रीलंकेला अनुराधापूर या ठिकाणी बोधिवृक्षाची रुजवात करण्यात आली. याच वृक्षाची फांदी नाशिकला मिळवण्यासाठी नाशिकमधील शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टने त्यासाठी पुढाकार घेतला. तर फांदीच्या रोपणांसह बुद्धस्मारकात इतर आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे साकडे ट्रस्टने आमदार ॲड. राहुल ढिकले यांना घातले आहे.

शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या मागणीची दखल घेत आ. ॲड. ढिकले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे या सोहळ्याच्या सर्व नियोजनाची जबाबदारी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी आ. ढिकले, ट्रस्टचे पदाधिकारी तसेच मनपा व पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधून प्रत्यक्ष बुद्धस्मारकातील नियोजित जागेची पाहणी केली. बोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण केल्यानंतर संबंधित जागेला तारेचे कुंपण घालणे, पोलिस बंदोबस्त देणे, पूजा करणार्‍या बौद्ध भिक्खूंच्या निवासाची व्यवस्था करणे तसेच वर्षभर या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांसाठी होणार्‍या खर्चासाठी शासकीय निधीची तरतूद करण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.

बोधिवृक्षाच्या फांदीचा असा प्रवास होणार

शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टने श्रीलंकन सरकारशी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बोधिवृक्षाची फांदी देण्यासाठी तेथील सरकारने तयारी दाखवली. त्यानुसार २३ मे रोजी विमानातून मुंबईला बोधिवृक्षाची फांदी येणार आहे. त्यानंतर २३ व २४ मे या दोन दिवसांत ऐतिहासिक सोहळ्यात या फांदीचे रोपण केले जाणार आहे.

ऐतिहासिक बोधिवृक्षाची फांदी थेट श्रीलंकेतून मुंबईमार्गे नाशिकमध्ये आणली जाणार आहे. बोधिवृक्षाची फांदी स्थापित होणे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब राहणार आहे. फांदी रोपण सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

-भदन्त सुगत, अध्यक्ष, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news